आईच्या आनंदात स्वार्थ (?) !
विवाह म्हटले की, त्यात धार्मिक विधी करणे; पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलावून तो सोहळा थाटामाटात साजरा करणे असे प्रकार येतात. विवाहात आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा सर्वजण पुरेपूर आनंद घेतात. यातून आपुलकी, प्रेमळता वाढते, तसेच नात्यांमधील ओलावा टिकून रहातो. मोठ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, सर्वांच्या शुभेच्छा मिळतात. विवाहसोहळा अत्यानंदात पार पडतो. अर्थात् विवाह इतक्या थाटामाटात साजरा करायचा म्हटला की, कष्ट हे आलेच ! मुला-मुलीच्या आई-वडिलांना तर यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. याच पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने नुकतेच एक विधान केले. ती म्हणते, ‘‘माझ्या मुलांना ‘मी आनंदी व्हावे’, असे खरोखरच वाटत असेल, तर त्यांनी सर्वांत चांगली गोष्ट करावी, ती म्हणजे पळून जाऊन लग्न करणे.’’ खरे तर मुले पळून जाऊन लग्न का करतात ? तर त्यांच्या प्रेमाला घरून विरोध असल्यासच ! परंतु येथे तर एका आईने असे म्हणणे कितपत योग्य किंवा सयुक्तिक आहे ? मुलांनी पळून जाऊन लग्न केले, तर त्यांना थोरामोठ्यांचा आशीर्वाद कसा मिळणार ? आप्तेष्टांच्या समक्ष विवाहाची सप्तपदी पूर्ण करणे यातून मिळणारे समाधान त्यांना अनुभवता कसे येणार ? मुलांच्या आनंदापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी त्यांना अयोग्य पर्याय निवडण्यास सांगणे हे योग्य आहे का ? अशा प्रकारे मुलांसमोर अयोग्य पर्याय ठेवणारी स्त्री ‘आई’ या पदाला अशोभनीयच ठरते ! ‘मुलांचा आनंद, तो माझा आनंद’, असे मानणारी आई ही सर्वाेच्च आणि म्हणूनच आदरणीय अन् दैवतासमान ठरते.
थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे. समजा या अभिनेत्रीचा एखाद्या स्वार्थी आईने आदर्श घेतला, तर याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे मान्यवरांनी किंवा प्रसिद्धवलय लाभलेल्या व्यक्तीमत्त्वांनी विधाने करतांना भान ठेवावे, सावधगिरी बाळगावी. कोणत्याही आईने स्वतःचे ‘आई’पण न्यून होऊ देऊ नये ! ते टिकवून ठेवणे आईच्याच हातात असते, याची जाणीव असू द्यावी !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.