काजवा (काँग्रेस नेते राहुल गांधी) कधी सूर्य (छत्रपती शिवराय) होऊ शकत नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे मुसलमानांच्या राजवटीत तळपणारा शौर्याचा तेजस्वी तारा होय ! त्यांनी आपल्या शौर्याच्या तेजाने इस्लामिक राजवटीला होरपळून टाकले. स्वतःची युद्धनीती त्यांनी अस्तित्वात आणली, राबवली आणि जगप्रसिद्ध केली. नवे नवे युद्धतंत्र वापरून त्यांनी जगाच्या युद्धशास्त्रात स्वतःचा ठसा उमटवला आणि युद्धशास्त्र अधिक प्रगल्भ केले; म्हणूनच त्यांची युद्धनीती जगात अव्वल दर्जाची ठरली. जगातील अनेक रणधुरंधरांनी छत्रपती शिवरायांचे अनुयायी होण्यात धन्यता मानली.
काँग्रेसने मध्यंतरी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात राहुल गांधी यांच्या छायाचित्रामागे छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक गाणे लावण्यात आले आहे. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राहुल गांधी यांची तुलना करण्यात आली आहे. खरे तर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे असा कोणता वकूब (अक्कल) आहे की, त्यांची तुलना छत्रपती शिवरायांशी करावी ! छत्रपती शिवराय निर्व्यसनी होते. छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला स्पर्शही केला नाही. ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी कशा प्रकारे वावरतात, त्याची छायाचित्रे आणि चित्रफिती सर्वत्र प्रसारित झाली आहेत. अशा अत्यंत सामान्य व्यक्तीची तुलना छत्रपती शिवरायांसारख्या स्वराज्य संस्थापकांशी करणे, म्हणजे शिवरायांचा केलेला हा अपमान आहे. राहुल गांधींकडे कोणत्याही प्रकारचे शौर्य नाही, तेजस्वी बुद्धीचा अभाव आहे. ‘छत्रपती शिवरायांच्या तेजस्वितेच्या पुढे राहुल गांधी एखाद्या काजव्याच्या तुलनेचे आहेत’, असे सुद्धा म्हणता येत नाही.
१. राहुल गांधी यांची अत्यंत सुमार बुद्धीमत्ता
छत्रपती शिवरायांनी कधीही असत्य भाषण केले नाही. ते स्वतःच्या निश्चयापासून कधीही ढळले नाहीत. कोणत्याही ऐतिहासिक पुरुषांचा त्यांच्याकडून अवमान झाला नाही. राहुल गांधी तर अनेक ऐतिहासिक पुरुषांचा अवमान करण्यासाठी जन्माला आले आहेत कि काय ? असे वाटावे, असे त्यांचे आचार आणि विचार आहेत.
छत्रपती शिवरायांची वाणी गंगेप्रमाणे पवित्र आणि शुद्ध होती. राहुल गांधींना अनेक शब्दांचा स्पष्ट उच्चार करता येत नाही. संस्कृत भाषेचा तर त्यांना गंधही नाही. छत्रपती शिवराय संस्कृत भाषेतही प्रवीण होते. छत्रपती शिवरायांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांचा अभ्यास अन् त्याप्रमाणे आचरण केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना आदर्श मानून त्यांनी राज्यकारभार केला. छत्रपती शिवरायांची राष्ट्रभक्ती, स्वामीनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा आणि धर्मनिष्ठा ध्रुव तार्याप्रमाणे अढळ होती. राष्ट्रभक्ती, स्वामीनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा आणि धर्मनिष्ठा या गोष्टींशी राहुल गांधींचा दूरदूरपर्यंतचाही संबंध नाही. श्रीराम आणि श्रीकृष्ण चरित्राचा साधा परिचय सुद्धा राहुल गांधींना नाही; म्हणूनच तेजस्वी तार्याशी काजव्याचा संबंध जोडणारी व्यक्तीसुद्धा अत्यंत सुमार बुद्धीमत्तेची आहे, यात वाद नाही.
२. छत्रपती शिवरायांशी राहुल गांधींची तुलना करणे म्हणजे बुद्धीचे दिवाळे निघाल्याचे द्योतक !
अफझलखान वध, आगर्याहून सुटका, शाहिस्तेखानाची तोडलेली बोटे या आणि अशा असंख्य महत्त्वपूर्ण घटना छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील ‘सर्वोत्कृष्ट युद्धनीती’ची साक्ष देणार्या आहेत. छत्रपती शिवरायांनी एकदा वापरलेले डावपेच दुसर्यांदा कधीही वापरले नाहीत. प्रत्येक वेळी नवे डावपेच वापरून महाबलाढ्य अशा औरंगजेबाला सुद्धा जेरीस आणले.
साध्या लोकशाही निवडणुकीत स्वतःचा राजकीय पक्ष जिंकून येण्यासाठी कोणताही प्रभावी डावपेच राहुल गांधींच्या बुद्धीची तेजस्विता प्रकट करू शकलेली नाही. अशा अत्यंत निम्नातील निम्नस्तरावर असणार्या राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवरायांसारख्या तेजस्वी पुरुषाबरोबर करावी, असे कुणाला वाटत असेल, तर त्याच्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे, असे निश्चित समजावे, तसेच अत्यंत सुमार माणसाच्या गळ्यात कोहिनूर हिर्यांची माळ घातल्यासारखे आहे.
३. छत्रपती शिवरायांप्रमाणे राहुल गांधींचा वचक आहे का ?
छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या हालचाली आणि शत्रूचे डावपेच ओळखून पूर्वसिद्धता केली अन् शत्रूवर मात करून स्वतःचा धाक बसवला. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज यांचे स्वतःचे आरमार दल होते. त्या बलाढ्य आरमाराशी सामना करू शकणारे आणि त्यांच्यावर आपले वर्चस्व अन् वचक प्रस्थापित करणारे बलाढ्य आरमार दल अल्पावधीत निर्माण करणारा ‘हिंदूंचा राजा’ म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. राहुल गांधींनी असा वचक स्वतःच्या नजीकच्या लोकांवर तरी बसवला आहे का ?
४. राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे हा राष्ट्रद्रोह !
कोंबड्याला मोर, कावळ्याला राजहंस, गांडुळाला गरूड, राईला मेरुपर्वत म्हणणारा गोतावळा सभोवती असेल, तर अशा लोकांनी राहुल गांधींच्या पौरुषत्वाचे कितीही गुणगान गायले, तरी त्याला छत्रपती शिवरायांसारख्या तेजस्वी सूर्याशी बरोबरी करता येणार नाही.
हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे छत्रपती शिवराय आणि हिंदुत्व अन् हिंदु धर्माला कस्पटासमान लेखणारे राहुल गांधी यांची तुलना कशी करता येईल ? ‘निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी’, अशी समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवरायांसाठी वापरलेली विशेषणे राहुल गांधींना कदापि लावता येणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधीजींचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू’, असे संबोधन वापरले. त्या परिवारातील राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे, हा राष्ट्रद्रोह आहे. एवढेच नाही, तर छत्रपती शिवरायांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या नंतरच्या काळातील ज्या शूरवीर मावळ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले, त्यांचाही तो अपमान आहे. त्यांच्या पराक्रमामुळे वायव्य सरहद्दीकडून अनेक शतके हिंदुस्थानवर आक्रमण झाले नाही.
५. छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना करणार्यांना कठोरात कठोर शासन व्हावे !
वैदिक काळातील हिंदूंची भूमी पूर्णपणे स्वतंत्र करून भगव्या ध्वजाखाली आणणे, म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे होय ! हा संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला. त्या संस्कारांनी प्रेरित झालेले मावळे हिंदुस्थानचे नेतृत्व करत होते. छत्रपती शिवरायांची विजयाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्राणाची बाजी लावली ती या वीर मावळ्यांनी ! या ऐतिहासिक वीर परंपरेचा अपमान करून अखंड हिंदुस्थानला खंडित करणारे पहिले पंतप्रधान हे राहुल गांधींचे पणजोबा (जवाहरलाल नेहरू) आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्वप्नाचा भंग करणार्या कुळात जन्माला आलेल्या राहुल गांधींची तुलना महाराजांशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व शूरवीर सम्राटांचा आणि त्यांच्या विजयी परंपरेचा अपमान करण्यात आला आहे. अशा अपराधासाठी राहुल गांधी आणि त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणार्यांना कठोरात कठोर शासन व्हावे, हीच या देशातील तमाम हिंदु जनतेची मागणी आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.३.२०२४)
संपादकीय भूमिकाछत्रपती शिवाजी महाराजांना ‘लुटारू’ म्हणणारे ‘काँग्रेसवालेच खरे लुटारू आहेत’, हे जाणून त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवा ! |