सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेला, म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. निकुंज नीलेश मयेकर (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. निकुंज नीलेश मयेकर हा या पिढीतील एक आहे ! |
१. प्रवासात कु. निकुंज याला त्रास होत असणे; पण त्याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर श्रद्धा असल्याने त्याने हिंदु एकता दिंडीला येण्याचे ठरवणे : ‘८.५.२०२२ या दिवशी ‘फोंडा, गोवा येथे हिंदु एकता दिंडी आहे’, असे समजल्यावर मला फार आनंद झाला. माझा मुलगा कु. निकुंज यालाही दिंडीत सहभागी व्हायचे होते. आम्हाला म्हापसा येथून फोंडा, गोवा येथे यावे लागणार होते. निकुंजला प्रवासाचा त्रास होतो. त्याला गाडीत उलटी होते. त्यामुळे मी त्याला सांगितले, ‘‘तू दिंडीला येऊ नकोस’’; पण त्याचा दिंडीला येण्याचा ठाम निश्चय होता. त्याच्यात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. तो मला म्हणाला, ‘‘मला दिंडीला येऊन घोषणा द्यायच्या आहेत.’’ त्या रात्री त्याला स्वप्नात प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन झाले. दुसर्या दिवशी सकाळी तो मला म्हणाला, ‘‘गुरुदेवांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला आहे की, ते माझ्या समवेत आहेत. मी दिंडीला येणारच. तू गुरुदेवांवर श्रद्धा ठेव. तेच माझी काळजी घेणार आहेत.’’ त्या वेळी मला त्याची प.पू. गुरुदेवांवर असलेली ठाम श्रद्धा जाणवली.
२. कु. निकुंजला एरव्ही चालतांना होणारा त्रास गुरुदेवांनी शक्ती दिल्यामुळे दिंडीत चालतांना न होणे आणि त्याने दिंडीत क्षात्रभावाने घोषणा देणे : दिंडीला जातांना निकुंजला गुरुदेवांच्या कृपेने कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याच्यात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एरव्ही तो काही अंतर चालल्यावर त्याचे पाय दुखतात आणि त्याला दमायला होते; पण गुरुदेवांच्या कृपेने तो संपूर्ण दिंडीत उत्साहाने सहभागी झाला. तो दिंडीत देहभान विसरून क्षात्रभावाने घोषणा देत होता. त्याने कोपरा सभेतही घोषणा दिल्या. गुरुदेवांनीच त्याला ही शक्ती दिली.
३. दिंडीच्या आदल्या दिवशी निकुंजने काढलेले दिंडीचे चित्र पाहून भावजागृती होणे : दिंडीच्या आदल्या दिवशी निकुंजने दिंडीचे चित्र काढले होते. त्या चित्रात त्याने अनेक भगवे ध्वज काढले. त्याने धर्मध्वज धरलेल्या एका साधकाचे चित्र काढले. त्या चित्रावर त्याने ‘अमृत महोत्सव सोहळा. भगवा रंग एक झाला’, असे लिहिले. त्याने काढलेले चित्र पाहून माझी भावजागृती झाली.
‘गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला या दैवी दिंडीत सहभागी होता आले’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्रगती नीलेश मयेकर (कु. निकुंजची आई), धुळेर, म्हापसा, गोवा. (३१.५.२०२३)