आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !
|
आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासाने पावन झालेल्या सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या. त्यामुळे सभागृह बांधकामासाठीचा व्यय वाया गेला कि काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.
सिद्धबेट येथे ज्ञानेश्वर माऊली यांचे त्यांच्या भावंडासह वास्तव्य होते. त्यामुळे या पवित्र बेटाला भेट देण्यासाठी भाविक आणि वारकरी येत असतात. त्यांच्या विसाव्यासाठी, स्थानिक वारकरी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हे सभागृह बांधण्यात आले; परंतु सभागृह बांधल्यापासून त्याचा उपयोग केला जात नाही. ते तसेच पडून आहे. सभागृहातील फरशांची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी पशू-पक्षांची विष्ठा पडलेली दिसून येते. येथे कुणी येत नसल्याने मद्यपी मद्य पिण्यासाठी त्याचा वापर करून मद्याच्या रिकाम्या बाटल्या तेथेच ठेवत असल्याचे चित्र आहे. तसेच या सभागृहाला बंदिस्त असे प्रवेशद्वार नसल्याने तेथे कुणाचाही वावर होत असतो. या सभागृहाची नगरपालिकेने देखभाल केली, तर त्याचा लाभ भाविकांना होईल.
आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले की, सभागृहाच्या सुरक्षेसाठी बंदिस्त प्रवेशद्वार लावले जाईल. भाविकांना ध्यानधारणेची सुविधाही लवकरच निर्माण करू. स्वच्छता आणि सिद्धबेट स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र कर्मचारी नेमण्याचा आदेश दिला जाईल. (लोकांनी तक्रार करेपर्यंत नगर परिषद प्रशासन झोपले होते का ? आतापर्यंत त्यांच्या लक्षात का आले नाही ? याचेही उत्तर मुख्याधिकार्यांनी द्यावे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|