नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
‘प्रत्येक युगामध्ये मानवमात्राच्या कल्याणाचे आणि उद्धाराचे निरनिराळे साधन असते.
अ. कृतयुगात ध्यानाने भगवत्प्राप्ती होत असे.
आ. त्रेतायुगात यज्ञ-यागादी कर्मांद्वारे भगवत्प्राप्ती होत असे.
इ. द्वापरयुगात श्रद्धापूर्वक भिन्न भिन्न उपचारांनी केलेल्या पूजनाने भगवत् प्रसन्नता, भगवत् दर्शन सहज प्राप्त होत असे.
ई. कलियुगात भगवंताचे मंगलमय नाम आरंभ झाले.
कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही. यासाठी कलियुगातील लोकांचा अधिकार पाहून त्यांना या अन्योन्य साधनांपेक्षा सुलभ साधन शास्त्र आणि संत यांनी प्रदान केले, ते म्हणजे भगवंताचे मंगलमय नाम !
१. ‘श्रीमद्भागवता’त कलियुगात भगवंताचे नामच श्रेष्ठ असल्याचे सांगणे कृते यद् ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः ।
द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात् ॥
– श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्लोक ५२
अर्थ : सत्ययुगात भगवंतांच्या ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञांनी, द्वापरयुगात पूजा-सेवेने जे फळ मिळते, ते कलियुगामध्ये फक्त भगवन्नामाचे कीर्तन केल्यानेच प्राप्त होते.
यामुळेच कलियुगात देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामासारखे सुलभ आणि सोपे साधन नाहीच नाही.
हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् ।
कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ।।
अर्थ : कलियुगात केवळ भगवंताचे नामच मनुष्याला तारणारे आहे. त्याविना अन्य गती नाही, हे त्रिवार सत्य आहे.
२. नामसाधनेला कुठलेच बंधन नसणे
नामाव्यतिरिक्त अन्य साधना करत असतांना देश, काल, पात्र यांचा विचार करावा लागतो. उदाहरण पहायचे झालेच, तर कर्म उपासनेसाठी विशिष्ट देश – काळ अपेक्षित असतो. एखादा यज्ञ आहे, तो आरंभ करण्यासाठी योग्य मुहूर्त असावा लागतो. सामान्यतः दिवसा तो करावा लागतो. ‘कुठलेही अनुष्ठान सूर्यास्तापूर्वी संपवावे, सूर्योदयापूर्वी आरंभावे’, असा सामान्य नियम आहे. (काही अपवादात्मक अनुष्ठान वगळता) योगाच्या प्रक्रिया, योग साधना ही विशेषतः पहाटेच्या शांत वेळी करावी.
शास्त्र सांगते, ‘ब्राह्मे मुहूर्ते बुध्येत धर्मार्थौ चानुचिन्तयेत् ।’ (मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक ९२), म्हणजे ‘ब्राह्म मुहुर्तावर उठून धर्म, अर्थ आदीचे चिंतन करावे.’
ब्राह्मणांना नित्यकर्मातील ब्रह्मयज्ञ, तर्पण आदी कर्म सूर्योदयापूर्वी करता येत नाहीत. ब्रह्मयज्ञ सूर्यास्तानंतर करता येत नाही. प्रातःकाळी आणि सायंकाळी संध्या करतांना सूर्योदय अन् सूर्यास्त यांचा विचार करावाच लागतो; परंतु या सर्व भगवंतप्राप्तीच्या साधनांमध्ये एकमेव हरिनाम हे साधन असे आहे, ‘ज्याला कुठलेच बंधन नाही.’
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, ‘काळ वेळ नाम उच्चारिता नाही । दोन्ही पक्ष पाही उद्धरती ।। (अर्थ : नामोच्चारासाठी काळ आणि वेळ हे काही पहायची आवश्यकता नाही. नामजपामुळे इह आणि पर लोक या दोन्ही ठिकाणी जीवाचा उद्धार होतो.)
भक्तीशास्त्रात एक वचन आहे,
‘शतं विहाय भोक्तव्यं सहस्त्रं स्नानमाचरेत् ।
लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं स्मरेत् ।।’
अर्थ : १०० कामे सोडून भोजन करावे, सहस्रो कामे सोडून तीर्थ-स्नानादी करावे, लाख कामे सोडून सत्पात्री दानादी करावे आणि कोटी कामे सोडून प्राधान्याने भगवन्नास्मरण करावे.
३. नाम कसे घ्यावे ? आणि दश अपराध कोणते ?
नामाचे संपूर्ण फलप्राप्त होण्यासाठी कसे घ्यावे ? तर ते दश अपराध विवर्जित असावे. हे १० अपराध कोणते ? तर
सन्निंदाऽसति नामवैभवकथा श्रीशेषयोर्भेदधीः
अश्रद्धा श्रुतिशास्त्रदेशिकगिरां नाम्न्यर्थवादभ्रमः ।
नामास्तीऽति निषिद्धकर्मविहितत्यागो हि धर्मान्तरैः
साम्यं नाम्नि जपे शिवस्य च हरेर्नामापराधा दश ।।
अर्थ : नाम घेत असतांना शुद्ध अंतःकरणाने दशदोष विवर्जित घ्यावे. हे दोष पुढीलप्रमाणे आहेत –
३ अ. दश अपराध :
अ. संत-निंदा म्हणजे साधू सत्पुरुषांची निंदा. खरे तर ‘कुणाचीही निंदा आपल्या मुखाने होणार नाही’, याची दक्षता नामधारकाने सदैव घेतली पाहिजे.
आ. ज्याचा नामावर विश्वास नाही, अशा अयोग्य, अश्रद्ध, नास्तिक व्यक्तीला नामाचे महत्त्व आणि वैभव सांगत बसू नये.
इ. नामसाधना करतांना हरिहर (श्रीविष्णु-शिव) हा भेद करू नये. ‘हरिचे किंवा हराचेच नाम श्रेष्ठ आणि अन्य कनिष्ठ’, असा भाव मनात असू नये.
ई. नाम घेत असतांना वेद, शास्त्र आणि सद्गुरु यांच्या वाणीवर पूर्ण श्रद्धा असावी.
उ. ‘अमुकच नाम श्रेष्ठ’, असा नामार्थ वादभ्रम करू नये.
ऊ. अमुक नामाचा अमुकच अर्थ इत्यादी वादात पडू नये.
ए. ‘माझ्याकडे नाम आहे, मी पुष्कळ नाम घेतो, म्हणजे मला कसलेही उचित – अनुचित कर्म करण्याचा अधिकार आहे. मी पाप केले, तरी ते माझ्याकडे रहात नाही’, अशी निषिद्ध वृत्ती मनात ठेवणेही एक अपराध आहे.
ऐ. विहित त्याग, म्हणजे वेदशास्त्रानुबोधित कर्माचा त्याग करणे, हाही अपराध आहे.
ओ. स्वधर्म सोडून अन्य धर्माचे स्वीकार अर्थात् परमेश्वराने ज्या वर्णात आपल्याला जन्म दिला त्या वर्णाचे, आपण ज्या अवस्थेत आहोत, त्या आश्रमाचे धर्म तंतोतंत पाळले पाहिजेत. दुसर्या धर्माचा अवलंब स्वमताने करायचा नाही.
औ. शिव आणि विष्णु यांच्या नावाची परस्पर तुलना करायची नाही. दोन्ही नावे सारखीच आहेत. ‘कोणतेही घ्या’, असे नाही, तर कुठल्याही एका नामाचा निष्ठेने जप करावा.
४. नामाचे फळ
थोडक्यात अशा दोषांनी विवर्जीत नाम घ्यावे, ते नित्यनेमाने प्रतिदिन निरंतर घ्यावे. ‘नामामध्ये नित्य नियम ठेवणारे लोक दुर्लभ असतात’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. नामाचे फळ ‘श्रीमद्भागवत’ सांगते –
‘अज्ञानादथवा ज्ञानात् उत्तमश्लोकनाम यत् ।
सङ्कीर्तितमघं पुंसो दहेदेधो यथानलः ॥’
– श्रीमद्भागवत, स्कंध ६, अध्याय २, श्लोक १८
अर्थ : अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला, तर त्याचे भस्म होऊन जाते, तसेच जाणून-बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंतांच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘नाम घेता विठोबाचे । पर्वत जळती पापांचे ।’
अर्थ : विठ्ठलाचे नामसंकीर्तन केल्याने अनेक जन्मांची, जन्मांतरीची पापे जळून भस्म होतात.
नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायणा ।।
अर्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात की, देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामसंकीर्तन हे साधन अतिशय साधे असून अत्यंत सोपेही आहे. त्याने मनुष्याची जन्मजन्मांतरीची पापे जळून खाक होतात. परमार्थ करण्यासाठी कसलेच कष्ट उपसायची किंवा घरदार सोडून वनात जाण्याची आवश्यकता उद्भवत नाही, केवळ वाचेने नाम घेतल्याने नारायण स्वतःहून आणि सुखाने आपल्या घरी चालत येतो.
५. संत आणि सद्गुरु यांनी सांगितलेले नामाचे महत्त्व
‘श्रीमद्भगवद्गीते’त ‘विभूती योग’ सांगतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २५ म्हणजे ‘सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे.’ भगवंताच्या नामाबद्दल किती वर्णन करावे, ते केवळ वर्णन करून समजणार नाही. साखर किती गोड आहे ? सहस्रो पाने लिहिली, तरी ती खाल्ल्याखेरीज तिच्या माधुर्याचा अनुभव येणार नाही. तसे नाम घेतल्याविना नामामृत गोडी कळणार नाही.
अ. प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी : थोर दत्तावतारी सत्पुरुष प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले, ‘१३ कोटी नामजप कराल, तर आपल्या कुंडलीतील एकेक स्थान एक एक कोटी जपाने शुद्ध होईल. १२ कोटी जपाने १२ स्थाने शुद्ध होतील आणि १३ व्या कोटी जपानंतर साक्षात् भगवत्दर्शन होईल.
आ. समर्थ रामदासस्वामी : महाराजांनी आपल्या साधना काळात २४ लाख गायत्री पुरश्चरणासह १३ कोटी रामनाम घेतले. साक्षात् रामरायाने त्यांना अनुग्रह दिला.
इ. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज : यांना ‘नामावतार’ म्हटले जाते, अशा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या अवतार कार्यात कुणालाही नामाखेरीज अन्य कुठले साधन सांगितले नाही. ‘तुम्ही अनुसंधानपूर्वक नित्य नाम घ्या. पुढचे सगळे मी करीन, माझ्यावर सोडा’, असे महाराज आत्मविश्वासाने सांगत.
मनुष्याच्या जीवितामध्ये सर्वाधिक अडणारा अभिमान आणि अहंकार आहे. तो भगवत् साक्षात्कारातील मोठा प्रतिबंध आहे. त्याला दूर कसे कराल ? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात –
अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने ।
हाच सुबोध गुरूचा मारावा तो समूळ नामाने ।।
अर्थ : मनुष्याला असलेला अभिमान हा सर्वांत मोठा शत्रू आहे. हा सर्वांनाच त्रास देतो. त्यामुळे सद्गुरु सांगतात की, नामजपाने या शत्रूचा समूळ नायनाट करावा.
ई. संत नामदेवांनी म्हटले आहे, ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।’
उ. जगद्गुरु संत श्री तुकोबाराय सांगतात, ‘जिथे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयात फिके पुढे शांतीब्रह्म ।’
ऊ. संत एकनाथ महाराज : हे नाम न घेणार्यांचा तीव्र निषेध करतात. ते म्हणतात, ‘नामाविण मुख सर्पाचे ते बीळ जिव्हा नव्हे काळसर्प आहे.’
कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानाम् ।
अर्थ : हे नाम म्हणजे सर्व हितकारक गोष्टींचा मोठा ठेवा आहे. ‘कलितील मलाचा’, म्हणजे कलियुगातील सर्व दोषांचा नाश करणारे हे निर्मळ अंतःकरण करणारे अत्यंत पवित्रतम असे साधन आहे.
ए. महर्षि व्यास : संपूर्ण श्रीमद्भागवत सांगून झाल्यावर महर्षि वेदव्यास म्हणतात,
नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् ।
प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् ।।
– श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय १३, श्लोक २३
अर्थ : ज्या भगवंताच्या नामाचे संकीर्तन सर्व पापे सर्वथैव नष्ट करते आणि ज्या भगवंताच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करते, त्याच परमतत्त्वस्वरूप श्रीहरिला मी नमस्कार करतो.
६. प्रतिदिन नामसाधना करणे महत्त्वाचे !
मानवी जीवन पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही, हे मानव जीवनाचे दुर्लभत्व अमौलिकत्व जाणून आपणही नित्य जीवनातील अनावश्यक असा फाफट पसारा दूर सारून प्रतिदिन कुठे तरी एकांतात केवळ देवाच्या सान्निध्यात वा अनुसंधानात राहून नामसाधना अवश्य करावी. जेवढा वेळ जमेल, तेवढा वेळ प्रतिदिन नियमाने करावी.’
– वे.शा.सं. अनंतशास्त्री मुळे (गोंदीकर), श्रीक्षेत्र आळंदी देवाची, जिल्हा पुणे.
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी ते मार्च २०२४)