Citizenship Refugees Karnavati: कर्णावती (गुजरात) येथे १८ हिंदु निर्वासितांना दिले भारतीय नागरिकत्व !
कर्णावती (गुजरात) – गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात १८ हिंदु निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ‘भारतीय नागरिकत्व प्राप्त करणार्या सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहे’, असे संघवी यांनी सांगितले.
वर्ष २०१६ आणि २०१८ च्या राजपत्रातील अधिसूचनेच्या द्वारे गुजरातमधील कर्णावती, गांधीनगर आणि कच्छ या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य समुदायातील निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कर्णावती जिल्ह्यात रहाणार्या पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित अल्पसंख्यांकांना सहज आणि लवकर भारतीय नागरिकत्व मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असे संघवी यांनी सांगितले.