Goa IT Raids : गोव्यातील कर बुडवणार्या औषधनिर्मिती आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांवर आयकर खात्याच्या धाडी
कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचे उघड
(‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने म्हणजे कार्यक्रमांचे आयोजन करणारी आस्थापने)
पणजी : कर बुडवल्याच्या प्रकरणी आयकर खात्याच्या अधिकार्यांनी राज्यातील औषधनिर्मिती आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांवर धाडी घालून कोट्यवधी रुपये कह्यात घेतल्याचे वृत्त आहे. वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.
देशभरात उत्पन्न होणार्या औषधांपैकी १२ टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात. गोव्यात कार्यरत असलेल्या ८० औषधनिर्मिती प्रकल्पांमधून प्रतिवर्षी १४ सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होत असते. वेर्णा आणि करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील ३ औषधनिर्मिती आस्थापनांची आयकर खात्याच्या अधिकार्यांनी झडती घेतली.
आयकर खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरे उत्पन्न लपवण्यासाठी काही आस्थापनांनी बनावट देयकांचा वापर केला आहे. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने कार्यक्रमासाठी निवासी उपाहारगृहातील निवासी खोल्या भाड्याने घेणे, तसेच अन्नपदार्थ आणि पेय यांचा व्यवहार देयकांच्या माध्यमातून न करता थेट रोख पद्धतीने करत होते. यामुळे कर बुडवला जात होता. या आस्थापनांनी मोठ्या प्रमाणावर कर बुडवल्याचे आढळून आले आहे. अशा कार्यक्रमांसाठी काळ्या पैशांचा वापर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयकर खात्याची धाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर काही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनाच्या अधिकार्यांनी गोव्याबाहेर पलायन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.