रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार सर्फराज २ वर्षांसाठी हद्दपार
रत्नागिरी – येथील गवळीवाड्यातील सराईत गुन्हेगार सर्फराज उपाख्य बॉक्सर अहमद शहा याला उपविभागीय दंडाधिकार्यांनी ३ जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार केले.
सर्फराजवर अमली पदार्थांसह मटका आणि जुगार यांचे पाच गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ३ जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभेची आचारसंहिता १६ मार्चला घोषित झाल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.
सर्फराज याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय दंडाधिकार्यांकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी घेउन उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी अंतिम आदेश देतांना ३ जिल्ह्यांमधून हद्दपार केले.