राजकारणात दूरगामी धोरण आवश्यक ! – भाऊ तोरसेकर
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भाऊ तोरसेकरलिखित ‘फक्त मोदीच’ या पुस्तकाचे प्रकाशन !
ठाणे, १७ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढायला कुणी सिद्ध नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक पुष्कळ सोपी झाली आहे. नरेंद्र मोदी हे वर्ष २०४७ च्या निवडणुकीची सिद्धता करत आहेत. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. अन्य पक्ष वर्ष २०१९ आणि वर्ष २०२४ च्या निवडणुकीकडे पहात आहेत. त्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हे २५ वर्षे पुढचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक नरेंद्र मोदीच जिंकणार आहेत. राजकारणात दूरगामी धोरण असणे आवश्यक असते आणि ते मोदींकडे आहे, असे मत लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
‘मोरया प्रकाशन’ आणि ‘ब्राह्मण सभा ग्रंथालय समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊ तोरसेकर यांच्या ‘फक्त मोदीच’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. तोरसेकर पुढे म्हणाले की, महायुती सरकारकडून ‘डबल इंजिन’चे सरकार आहे, असे सांगितले जाते; परंतु डबल इंजिन सरकार याचा अर्थ लोकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे वाटत असेल; पण प्रत्यक्षात तसे नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हीच २ डबल इंजिन आहेत.
लोकसभा निवडणूक निकालाचे असे अंदाज सांगतांना हे आकडे कुठून येतात ? वा कशामुळे येतात ?, याविषयी चर्चा करणारे आणि त्यामागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. ‘फक्त मोदीच’ हे पुस्तक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मागील १० वर्षांतील तोरसेकर यांचे तिसरे पुस्तक आहे. हे पुस्तक येणार्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अचूक आकडा सांगण्यासमवेतच असे आकडे कुठून येतात ? वा कशामुळे येतात ?, ते समजावण्यासाठी आहे, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रवींद्र चव्हाण, बालरोगतज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर, माजी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक संदीप पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.