सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दोळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ

श्री. विश्वास लोटलीकर

१ अ. भावाकडे कुटुंबासह सत्संगाला जाणे

‘आरंभी मला साधनेची आवड नव्हती; परंतु मी माझ्या आईला भेटण्यासाठी डोंबिवली (पूर्व ) येथील माझ्या मोठ्या भावाकडे (श्री. विजय लोटलीकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे) यांच्या घरी गेलो की, माझी आई मला सांगायची, ‘‘अरे, तुझा भाऊ सत्संगाला जातो. तूही जा. मग एके दिवशी आई म्हणाली, ‘‘आज आपल्या घरी सत्संग आणि भंडारा आहे. तू ये.’’ त्या दिवशी मी कुटुंबासह भावाकडे गेलो.

१ आ. प्रथमच सत्संगाला गेल्यावर मन एकाग्र होणे, साधकांच्या अनुभूती ऐकून उत्कंठा वाढणे आणि भंडारा अन् भजन यांतून आनंद मिळणे

सत्संगाला गेल्यावर तेथील उत्तरदायी साधक (कै. संपत तनपुरे) यांनी माझी ओळख करून दिली. सत्संगातील विषय ऐकून माझे मन एकाग्र होऊ लागले. काही साधक आपल्या अनुभूती सांगत होते, त्या ऐकून माझी उत्कंठा वाढली. त्यानंतर भंडारा झाला. (त्या वेळी भंडारा झाल्यानंतर भजने म्हटली जायची) आणि त्यातून आनंद मिळत गेला. नंतर सर्व साधक आपापल्या घरी निघून गेले. कै. संपत तनपुरे आमच्या घराजवळ रहात असल्यामुळे ते आणि आमचे कुटुंब एकत्रच निघालो. मी घरी गेल्यानंतर मला वेगळाच आनंद जाणवत होता. माझे कुतूहल वाढले होते.

१ इ. उत्तरदायी साधकांनी हाताला धरून साधनेत आणणे

१ इ १. उत्तरदायी साधकाने सत्संगाला येण्यासाठी भ्रमणभाष करणे : नंतर प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता डोंबिवलीच्या मोठ्या श्री गणपति मंदिरामध्ये सत्संग असायचा. त्या सत्संगाला आम्ही कुटुंबीय जाऊ लागलो. आम्ही कधी गेलो नाही, तर उत्तरदायी साधक दूरभाष करायचे. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. त्यानंतर ते मला शुक्रवारी कार्यालयातून निघतांना भ्रमणभाष करायचे, ‘‘आज सत्संगाला येताय ना ?’’ मग मला सत्संगाला जावेच लागायचे. सत्संग संपल्यावर मी ‘लवकर निघायचे’, असे ठरवून जात असे; परंतु सत्संग संपताच मला उत्तरदायी साधक सांगायचे, ‘‘थांबा जरा, आपण एकदमच जाऊया.’’ मग आम्ही सर्व आटपून साधनेविषयी बोलत घरी जायचो. त्यांनी मला हाताला धरून साधनेत आणले.

१ ई. सेवेला आरंभ आणि केलेल्या विविध सेवा

१. काही दिवसांनी मला सत्संगाचे दायित्व दिले. मी गुरुकृपेने सत्संग घेऊ लागलो.

२. नंतर उत्तरदायी साधकाने मला ग्रंथ वितरणाची सेवा दिली. त्यानंतर दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याची सेवा मिळाली.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्यापूर्वी गुरुकृपेने मला पत्रकारितेचा अभ्यास करायला सांगितले आणि मग काही वर्षे मी ठाणे जिल्ह्याचा पत्रकार म्हणून सेवा केली.

४. मी विज्ञापने आणण्याची सेवा करायला शिकलो. ती करत असतांना मला जिल्ह्यातील सेवांचे दायित्व मिळाले. अशा प्रकारे माझ्या सेवा वाढत गेल्या. मी सर्व सेवा आवडीने करू लागलो. त्यामुळे सेवेतील आनंद मिळू लागला.

५. कार्यालयातून आल्यावर मी एका साधकासह सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावत असे. देवाच्या कृपेने ग्रंथविक्री चांगली व्हायची आणि आम्हाला आनंदही मिळायचा. त्या वेळी मला प्रथमच सुगंधाची अनुभूती आली.

६. आमच्या येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन घ्यायचे ठरले. तेव्हा आम्ही सभेसाठी कापडी फलक लावणे, ‘होर्डिंग्ज’ लावणे, भित्तीपत्रके लावणे, अशा सेवा रात्री करायचो आणि सकाळी कामावर जायचो; परंतु आम्हाला कधीच थकवा जाणवला नाही. सेवेतून पुष्कळ आनंद मिळायचा.

७. डोंबिवली येथे एक मुसलमान व्यक्ती संस्थेशी जोडली गेली. ती हिंदी पाक्षिकाची वर्गणीदार झाली. ती आजही हिंदी ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाची वाचक आहे. ती व्यक्ती सनातनची सात्त्विक उत्पादने (साबण, अत्तर, दिनदर्शिका) घेते. ती व्यक्ती प्रत्येक गुरुपौर्णिमेला विज्ञापन देते.

१ उ. अन्य जिल्ह्यांत प्रसाराला जाणे

१ उ १. शनिवारी आणि रविवारी जळगाव येथे सत्संग घेऊन रविवारी रात्री आगगाडीने घरी येणे अन् सकाळी घरी न जाता तसेच कार्यालयात जाणे : उत्तरदायी साधकांनी ‘आता आपण अन्य जिल्ह्यांत जाऊन अध्यात्मप्रचार करायचा आहे’, असे सांगितले. तेव्हा प्रथम मनाची सिद्धता होत नव्हती. उत्तरदायी साधक भ्रमणभाष करून सांगायचे, ‘‘आज रात्री आपल्याला जळगावला जायचे आहे, त्या सिद्धतेने या.’’ मला जायचे नसले, तर मी काहीतरी कारण सांगायचो. त्यावर ते म्हणायचे, ‘‘ठीक आहे, पुढच्या शुक्रवारी जाऊया.’’ आता मी ‘नाही’ म्हणू शकत नव्हतो. सत्संग संपला की, तेथून बाहेर ‘बस’ असायची; मग आम्ही शुक्रवारी त्या ‘बस’ने निघून शनिवारी आणि रविवारी सत्संग घेऊन रविवारी रात्री आगगाडीने घरी यायचो. आम्ही जळगावहून सत्संग आटपून निघालो की, तेथील साधक आमच्यासाठी ठेचा-भाकरी घेऊन यायचे. ते खाऊन आम्ही झोपायचो आणि सकाळी घरी न जाता कार्यालयात जात असू. तो आनंद वेगळाच होता.

१ उ २. कुंभमेळ्याला सेवेसाठी जाणे : काही दिवसांनी मला कल्याण आणि अंबरनाथ येथील सेवेचे दायित्व मिळाले. गुरुपौर्णिमेचे प्रवचन, नामदिंडी अशा सेवांमध्ये आनंद मिळत गेला. डोंबिवलीचे उत्तरदायी साधक मला निरनिराळ्या सेवा देत असत. त्या वेळी मला ‘कुंभमेळ्याला जाऊ शकता का ?’ असे विचारले. मी कुंभमेळ्याच्या सेवेला गेलो. तेथील आनंदामध्ये मी माझी चाकरी आणि घर सारेच विसरून गेलो.

१ उ ३. सिंधुदुर्ग येथे प्रसार : मी सिंधुदुर्ग येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यासाठी एक मास जायचे ठरवले होते. तेथे सेवेसाठी पुष्कळ साधक आले होते. मी दिवसभर निरनिराळ्या ठिकाणी उन्हातून फिरायचो आणि रात्री येऊन सत्संग घ्यायचो; परंतु कधी कंटाळा आला नाही कि कधी त्रास झाला नाही. आम्हाला जेवणाचीही आठवण व्हायची नाही. कुठे मिळाले, तर जेवायचो. नाहीतर सायंकाळी येऊन भोजन करायचो; परंतु नेहमीच आनंद आणि उत्साह जाणवायचा. त्या वेळी अनेक साधक संस्थेशी जोडले गेले.

१ उ ४. विदर्भात प्रसाराला जाणे : अकोला, अमरावती आणि धिरी येथे आम्ही साधारण १० – १२ साधक प्रसाराला गेलो होतो. तेथे कूपनलिकेच्या पाण्याने अंघोळ, धर्मशाळेत रहाणे आणि जेवण कधी मिळायचे, तर कधी नाही. आम्ही रात्री अकोल्याच्या पुलावर भेळ किंवा दूध-पाव खाऊन रहात होतो. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरून प्रचार-प्रसार करायचो; परंतु कुणालाही कसलाच त्रास झाला नाही. हळूहळू नवीन साधक जोडले जाऊ लागले. आमच्या आनंदात अजूनच भर पडू लागली. काय ही गुरुकिमया ! तेथील दैनिक कार्यालयामध्ये जाऊन ओळख करून सत्संग आणि व्याख्याने यांची वृत्ते देणे अन् तेथे साधक जमा होणे, ही गुरूंचीच किमया आहे. त्या वेळी प्रतिदिन वेगवेगळ्या अनुभूती येत आणि आमचा आनंद द्विगुणित व्हायचा.

(क्रमशः)

– श्री. विश्वास लोटलीकर, म्हार्दाेळ, फोंडा, गोवा. (२६.४.२०२३)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/775275.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक