६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १७ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे
१. मंदिर परिसरातील धुलीकणांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे
१ अ. मंदिर परिसराची स्वच्छता करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवर करत असलेल्या अमर्याद प्रीतीविषयी कृतज्ञता वाटणे : ‘३०.५.२०२२ या दिवशी मी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील मंदिर परिसराची स्वच्छता करत होते. त्या वेळी तिथे नेहमीपेक्षा अधिक धूळ होती. स्वच्छता करतांना माझ्या मनात विचार चालू होता, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांवर किती प्रीती करतात ! ते त्यांना भूवैकुंठरूपी आश्रमात साधक, संत, सद्गुरु आणि तिन्ही गुरु अन् साक्षात् नारायणाच्या सहवासात ठेवतात. सगळ्यांवर अमर्यादित प्रीती करतात.’ तेव्हा याविषयी मला कृतज्ञता वाटत होती.
१ आ. मंदिर परिसरातील धूळ नेहमी शरणागतभावात असून ती एका कणाच्या रूपात असल्याने तिच्यात अहं नसणे आणि तिच्यातही चैतन्य येणे, ही गुरुदेवांची कृपा अन् प्रीतीच असणे : माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्वांवर प्रीती करतात, तर परिसरात जी धूळ आहे, तिच्यावर ते प्रीती कशी करत असतील ? परिसरातील ही धूळ गुरुसेवा कशी करत असेल ? तिच्याकडून मला काय शिकायला मिळत आहे ?’ याचे उत्तर गुरुदेवांनीच माझ्या लक्षात आणून दिले. ‘आपण ‘आपल्याला गुरुदेवांच्या चरणांची धूळ बनायचे आहे’, असा भाव ठेवताे . त्यासाठी ‘जी खरी धूळ आहे, तिच्याकडून मी शिकायला हवे.’ आश्रम परिसरात ‘श्री भवानीदेवी’ आणि ‘ऋद्धिसिद्धिसहित श्री सिद्धिविनायक’ मंदिर आहे. त्यांच्या चरणांची ही धूळ आहे. ती धूळ नेहमी शरणागतभावात असते. ती एका कणाच्या स्वरूपात असते; म्हणून तिच्यात अहं नाही. ही धूळ वैकुंठरूपी आश्रमातील आहे, म्हणजे तिच्यातही चैतन्य येणे, ही गुरुदेवांची कृपा आणि तिच्यावर असलेली प्रीतीच आहे.’
२. ‘प्रीतीस्वरूप गुरुदेव साधकांच्या माध्यमातून किती प्रीती करतात !’, याविषयी शिकायला मिळालेले सूत्र
मला काही साधिका सहजतेने म्हणतात, ‘‘तू किती गोड आहेस.’’ त्यांनी असे म्हटल्यावर मला वाटले, ‘माझ्यात गोड असे काहीच नाही. माझ्यात स्वभावदोष आणि अहं आहेत.’ प्रेमभाव हा साधकांमधील गुण आहे. ते माझ्यातील स्वभावदोष आणि अहं न पहाता गुणांना पहातात अन् प्रीती करतात. गुरुदेव मला साधकांच्या माध्यमातून ‘मी गोड आहे’, असे सांगून माझे कौतुक न करता साधकांमधील गुण दाखवून देतात आणि त्यांच्यातील प्रेमभाव अन् आपलेपणा शिकवतात. जर माझे मन कधी निरुत्साही असेल, तर साधकांचा सहवास आणि त्यांचे बोलणे, यांतून मला आनंद मिळतो.
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे मोक्षगुरु परात्पर गुरुदेवा, तुम्ही प्रत्येक कृतीतून किती शिकवता. आपण जे शिकवता, ते कृतीत आणण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– गुरुदेवांची,
कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.६.२०२२)