प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांनी दिलेली अमूल्य शिकवण !
१. ‘अतिथीचे हसतमुखानेच स्वागत करावे’, हे स्वतःच्या उदाहरणातून शिकवणे
‘प.पू. फडकेआजी नेहमीच आम्हा सर्वांना सांगायच्या, ‘‘घरात कितीही वाईट प्रसंग घडू दे किंवा एकमेकांशी वाद होऊ देत, कितीही अडचणी असू देत; परंतु दारावरील घंटा वाजली की, ‘बाहेरील व्यक्तीला घरात काय घडले आहे’, याविषयी काहीही कळता कामा नये. आलेल्या अतिथीचे हसतमुखानेच स्वागत केले पाहिजे.’’ त्यांचे स्वतःचे वागणे तसेच असे. ‘अनेक वेळा घरात घडलेल्या प्रतिकूल प्रसंगांतही दार उघडल्यावर त्यांचा चेहरा कधी अस्थिर झाला किंवा त्यांनी कधीही आलेल्या पाहुण्यांकडे चिंता व्यक्त केली’, असे झाले नाही.
२. ‘देव आपल्याकडे सतत पहात असतो’, हे लक्षात ठेवून नेहमी सर्वांशी चांगलेच वागायचे !
वर्ष १९७३ मध्ये एकदा मी, माझी धाकटी बहीण (कै. (सौ.) निशा बर्वे) आणि प.पू. फडकेआजी बाहेर गेलो होतो. वाटेत ओळखीतील एक बाई आमच्या समोरून चालल्या होत्या. तेव्हा प.पू. फडकेआजी त्यांच्याकडे पाहून हसल्या; परंतु त्या प.पू. फडकेआजींकडे पाहून हसल्या नाहीत. तेव्हा माझी बहीण प.पू. फडकेआजींना म्हणाली, ‘‘तुम्ही का त्यांच्याकडे पाहून हसलात ? त्या तुमच्याकडे पाहून हसल्या नाहीत.’’ प.पू. फडकेआजी म्हणाल्या, ‘‘असू दे. त्या कुठल्यातरी विचारात असतील; म्हणून त्यांचे लक्ष नसेल. त्या हसू दे किंवा नको, आपण त्याकडे लक्ष द्यायला नको. मी हसले नाही, तर त्यांच्यात आणि माझ्यात काय भेद राहिला ! ‘मी हसले’, ही माझी कृती देवाने पाहिली. देव आपल्याकडे सतत पहात असतो.’’
३. ‘अतिथी देवो भव’, असा भाव असल्याने बाहेरून आलेल्या नातेवाइकाला स्वतःचे वाढलेले पान देऊन स्वतः केवळ दूध-पोहे खाणे
वर्ष १९७७ मध्ये एका वैयक्तिक कामानिमित्त प.पू. फडकेआजी काही दिवस सकाळी ९.३० वाजता घरातून बाहेर पडत आणि दुपारी २.३० वाजता घरी येत. अशाच एकदा त्या दुपारी घरी परत आल्यावर मी त्यांना लगेच जेवायला वाढले. त्या दिवशी मोजकेच अन्न घरात शिल्लक होते. त्या जेवायला आरंभ करणार, इतक्यात दारावरील घंटा वाजली. प.पू. फडकेआजींचा भाचा आला होता. प.पू. फडकेआजींनी त्याला विचारले, ‘‘तुझे जेवण व्हायचे आहे ना ?’’ तो ‘हो’ म्हणाल्यावर आजींनी स्वतःसाठी वाढलेले ताट लगेच भाच्यासमोर ठेवले. नंतर साधारण दीड घंटा त्या त्याच्याशी बोलत होत्या. माझ्या मनात विचार आला, ‘‘आता या काय जेवणार ?’’ भाचा गेल्यावर मी त्यांना याविषयी विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपण घरातच आहोत ना ! मी घरातील काहीही खाऊ शकते. कदाचित् त्याच्या रूपात देवच आला असेल. आपल्याला काय ठाऊक ?’’ नंतर त्यांनी शांतपणे दूध-पोहे खाल्ले.
४. देवावरील श्रद्धेने कठीण प्रसंगांनाही धैर्याने सामोरे जाणे
वर्ष १९७५ मध्ये माझ्या मोठ्या भावाचे लहान वयात (वय २४ वर्षे) निधन झाले. नंतर वर्ष १९८३ मध्ये माझ्या मोठ्या बहिणीच्या यजमानांचेही अकस्मात् तरुण वयात निधन झाले. या सर्व प्रतिकूल प्रसंगांना प.पू. फडकेआजी अगदी धिराने सामोर्या गेल्या. तेव्हा अनेक लोक त्यांना काहीही बोलायचे. त्यामुळे आम्हा बहिणींना वाईट वाटायचे; पण प.पू. फडकेआजी आम्हाला समजवायच्या, ‘‘लोकांकडे किती लक्ष द्यायचे, हे आपण ठरवायचे. त्यांना काहीही बोलू दे. देवाला सगळे ठाऊक आहे ना ?’’ देवावरील दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोर्या गेल्या.
प.पू. डॉक्टर, ‘आपल्याच कृपेमुळे मला वरील सर्व सूत्रे आठवली आणि आपणच लिहून घेतलीत’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (समाप्त)
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) (प.पू. फडकेआजी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.२.२०२४)