Dattatreya Hosabale RSS:दत्तात्रेय होसबाळे यांनी पुन्हा रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी निवड !

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  पुन्हा एकदा दत्तात्रेय होसबाळे यांची सरकार्यवाह पदासाठी एकमताने निवड केली आहे. वर्ष २०२४ ते २०२७ पर्यंत ते या पदावर काम करतील. होसबाळे वर्ष २०२१ पासून सरकार्यवाहचे दायित्व पार पाडत आहेत. याची घोषणा १७ मार्च या दिवशी येथे सुरू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत करण्यात आली होती.

संघामध्ये प्रत्येक ३ वर्षांनी जिल्हा संघचालक, विभाग संघचालक, प्रांत संघचालक, क्षेत्र संघचालक, तसेच सरकार्यवाह यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया केली जाते. सरसंघचालकांनंतर सरकार्यवाह हे पद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.

(सौजन्य : News Talk)

कोण आहेत दत्तात्रेय होसबाळे ?

दत्तात्रेय होसबाळे हे कर्नाटकातील शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत. होसबाळे यांनी बेंगळुरू विद्यापिठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. १ डिसेंबर १९५५ या दिवशी जन्मलेले होसबाळे यांनी वर्ष १९६८ मध्ये वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. वर्ष १९७२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. होसबाळे हे अभाविप कर्नाटकचे राज्य संघटन मंत्री होते. यानंतर ते अभाविपचे राष्ट्रीय मंत्री आणि सहसंघटन मंत्री होते. ते सुमारे २ दशके अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री होते. यानंतर २००२-०३ च्या सुमारास त्यांना संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनवण्यात आले. वर्ष २००९ पासून ते सह-अध्यक्ष होते. दत्तात्रेय होसबाळे यांना त्यांची मातृभाषा कन्नड व्यतिरिक्त इंग्रजी, तमिळ, मराठी, हिंदी, संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान आहे. वर्ष १९७५-७७ च्या आणीबाणीविरोधी चळवळीतही सक्रीय होते. या काळात ते कारागृहातही गेले होते.