जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी हवा ! – पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे
‘इतरांमुळे आपल्याला त्रास होतो’, असे वाटणे, याचा अर्थ ‘आपण त्यांना मागील जन्मात त्रास दिलेला आहे आणि आता तो देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्रास भोगावा लागत आहे’, असे आहे. असे असतांना ‘इतरांना दोष देणे कितपत योग्य आहे ? प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून ते भोग आनंदाने भोगता येण्यासाठी साधना तीव्र करून गुरुकृपा संपादन करणे’, हाच त्यावरील उपाय आहे.
एखादे लहान मूल एखाद्याचा धक्का लागून पडते, तेव्हा ते मोठ्याने रडते; परंतु तेच मूल धावतांना पडते, तेव्हा ‘आपल्याला काही लागले आहे का ?’, या विचाराकडे दुर्लक्ष करून ते न रडता उठते. त्याचप्रमाणे ‘जेव्हा इतर लोक मला त्रास देतात, तेव्हा मला वाईट वाटते’; परंतु जेव्हा हे ‘देवाणघेवाण हिशोबामुळे घडते आहे’, म्हणजे ‘ही माझ्या कर्माची फळे आहेत’, हे साधना केल्यामुळे एखाद्याला कळते, तेव्हा त्यांच्याविषयी वाईट न वाटता ‘देव माझे प्रारब्ध संपवत आहे’, या विचारांमुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहातो.’
तात्पर्य मागील कित्येक जन्मांत जे काही पेरले त्याचा आतापर्यंत वृक्ष झाला असून त्या सर्वांची परतफेड या जन्मी करायची आहे.
साईबाबा म्हणतात, ‘माशीसुद्धा विनाकारण आपल्या अंगावर बसत नाही. तिचा पूर्वीचा काहीतरी ऋणानुबंध असतो’, म्हणजेच आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ईश्वरीय न्यायाने आपलेच पूर्वकर्म आणि त्याची परतफेड यांच्याशी संबंधित असते. मग ते कर्म चांगले असो वा वाईट !
जसे की, हातातील रबरी चेंडू ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने समोरच्या भिंतीवर मारु, तो तसाच मारणार्याकडे परत येतो. मग ती भिंत सिमेंटची असो वा मातीची किंवा लोखंडाची ! म्हणून ‘जे चांगले-वाईट घडते, ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठीच घडवतो’, असा भाव मनाशी ठाम झाला, तरच सर्व काही सुसह्य होऊन जीवनात आनंद घेता येईल आणि दुसर्यांनाही आनंद वाटता येईल.
(पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)