भारतीय शास्त्रीय संगीताने सर्वंकष उपचार होतात ! – शॉन क्लार्क, बँकॉक
|
फोंडा (गोवा) – मंत्र, नामजप आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील राग यांमुळे सर्वंकष उपचार होतात. या प्राचीन, कोणत्याही प्रकारे हानी न करणार्या उपचारपद्धतींचा वैद्यकीय चिकित्सेत उपयोग करण्यासंदर्भात संशोधन करण्याचे आवाहन आम्ही वैद्यकीय समुहाला करतो, असे उद्गार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी काढले. नुकतेच बँकॉक, थायलंड येथे झालेल्या ‘सेव्हन्थ ग्लोबल पब्लिक हेल्थ कॉन्फरन्स’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘निरामय आरोग्यासाठी, विशेषत: रक्तदाबावर केंद्रित संगीताचे उपाय’, हा शोधनिबंध सादर केला. या शोधप्रबंधाचे लेखक ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले असून श्री. क्लार्क सहलेखक आहेत.
श्री. शॉन क्लार्क यांनी मांडलेली सूत्रे
१. उच्च रक्तदाब असलेल्यांवर विविध ध्वनींच्या होणार्या परिणामांचा अभ्यास करणार्या ४ चाचण्या सादर केल्या. चाचणीपूर्वी आणि चाचणीनंतर यात सहभागी व्यक्तींची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या यंत्राद्वारे मोजण्यात आली, तसेच त्यांचा रक्तदाब प्रचलित रक्तदाब मोजण्याच्या यंत्राने मोजण्यात आला.
२. चाचण्यांमध्ये सहभागी व्यक्तींना चाचणीच्या पूर्व २ दिवस, तसेच चाचणीच्या रात्री त्यांचे रक्तदाबावरील औषध न घेण्याचे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठरवण्यात आले होते. चाचणीच्या दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व चाचण्या करण्यात आल्या.
३. प्रथम चाचणीत ५ व्यक्तींना भारतीय संगीतातील ‘राग गोरखकल्याण’ ऐकवण्यात आला. त्यानंतर सर्व व्यक्तींच्या नाडीचे ठोके सरासरी १५ टक्क्यांनी न्यून झाल्याचे आढळले. दुसर्या दिवशी सकाळी (७२ घंटे रक्तदाब नियंत्रक औषध घेतले नसतांनाही) ५ पैकी ४ व्यक्तींचा रक्तदाब न्यून झाल्याचे आढळले. सर्व व्यक्तींच्या प्रभावळीतील नकारात्मकता सरासरी ६० टक्क्यांनी घटल्याचे, तर सकारात्मकता १५५ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले.
४. दुसर्या चाचणीत २ व्यक्तींना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप ऐकवण्यात आला. तिसर्या चाचणीत ३ व्यक्तींना ‘ॐ’ या बीजमंत्राचा ध्वनी ऐकवण्यात आला. या दोन्ही चाचण्यांचे परिणाम पहिल्या चाचणीप्रमाणेच होते.
५. चौथ्या चाचणीत २ व्यक्तींना ‘मारकोनी’ या वाद्यवृंद समूहकृत ‘वेटलेस’ ही जगातील प्रसिद्ध ‘तणावमुक्ती देणारी’ म्हणून नावाजलेली संगीत रचना ऐकवण्यात आली. त्यानंतर सर्व व्यक्तींचा रक्तदाब न्यून झाल्याचे आढळले; परंतु नाडीचे ठोके वाढले. दुसर्या दिवशी सकाळी दोघांचाही रक्तदाब अजूनही न्यून झाल्याचे आढळले. आधीच्या ३ चाचण्यांच्या तुलनेत या चाचणीत सहभागी व्यक्तींच्या प्रभावळीतील नकारात्मकता मात्र वाढल्याचे आणि सकारात्मकता घटल्याचे आढळले; कारण ‘वेटलेस’ या संगीताची रचना करण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रॉनिक वाद्ये, तसेच या रचनेतील असम्यक स्वर आणि ध्वनी यांतून नकारात्मक स्पंदनांची निर्मिती होऊ शकते.