‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! – डॉ. परकार
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानामध्ये अव्वल !
रत्नागिरी – मुख्यमंत्री माझी शाळा या ४५ दिवसांच्या पहिल्याच अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणार्या कृ.चिं. आगाशे विद्यामंदिरने आता आपला ठसा राज्यातही उमटवावा. सुवर्णपदक विजेते गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांचे विद्यार्थी आज भारत शिक्षण मंडळ सुरेख पद्धतीने चालवत आहेत. यामुळेच पटवर्धन हायस्कूल, आगाशे विद्यामंदिरची घोडदौड चालू आहे, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी आणि येथील प्रसिद्ध डॉक्टर अलिमियाँ परकार यांनी केले. १६ मार्चच्या दुपारी हा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात झाला.
‘मुख्यमंत्री माझी शाळा अभियाना’तील यशाबद्दल शाळेत आज आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, साहाय्य करणारे पालक, गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी डॉ. केळकर म्हणाले की, हे यश एका दिवसात मिळालेले नाही. त्याकरता अनेक दिवस शिक्षक आणि पालक यांचा वाटा आहे. सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले. याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो.