Save Deities : केरळमध्‍ये अधिवक्‍त्‍यांच्‍या गट देत आहे १०० हून अधिक मंदिरांसाठी कायदेशीर लढा !

हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्‍याच प्रयत्न !

अधिवक्‍ता प्रतीश विश्‍वनाथन् व अधिवक्‍ता कृष्‍णा राज

थिरूवनंतपूरम्  (केरळ) – अधिवक्‍ता कृष्‍णा राज यांच्‍या नेतृत्‍वाखालील अधिवक्‍त्‍यांचा एक गट केरळमधील १०० हून अधिक हिंदु मंदिरांसाठी कायदेशीर लढा देत आहे. हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्‍यासाठी अलीकडे केरळच्‍या विविध न्‍यायालयात शेकडो याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आल्‍या आहेत. ही याचिका या अधिवक्‍त्‍यांच्‍या गटाच्‍या कष्‍टाचे फळ आहे. हिंदु मंदिरांच्‍या भूमीवर अतिक्रमण करणारे लोक, तसेच संबंधित ट्रस्‍ट आणि संस्‍था यांच्‍या विरोधात १०० हून प्रकरणे या गटाने हाती घेतली आहेत. या गटाच्‍या प्रयत्नांमुळे ‘सेंट फिलोमिना जनसंगम’ या ख्रिस्‍ती मिशनरी संस्‍थेला न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात आले आहे; कारण या संस्‍थेने कोन्‍नमकुलंगारा भगवती मंदिराची भूमी फसवणूक करून हडप केली होती आणि आता या गटाच्‍या प्रयत्नांमुळे यातील दोषींना अटक झाली आहे.

केरळमधील अधिवक्‍त्‍यांच्‍या या गटाचे नेतृत्‍व करणारे कृष्‍णा राज हे त्‍यांच्‍या हिंदुत्‍व विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्‍यांच्‍या गटामध्‍ये प्रतीश विश्‍वनाथन् यांच्‍यासारखे सहकारी अधिवक्‍ता आणि इतर काही हिंदुत्‍ववादी अधिवक्‍ते यांचा समावेश आहे. या लोकांनी त्‍यांच्‍या मोहिमेसाठी वर्ष २०१८ मध्‍ये ‘सेव्‍ह डेटीज’ नावाची संस्‍था चालू केली होती. यामध्‍ये अधिवक्‍ता कृष्‍णा राज यांच्‍या व्‍यतिरिक्‍त बी.एन्. शिवशंकर, प्रतीश विश्‍वनाथन्, के.ए. बालन, ई.एस. सोनी, कुमारी संगीता एस्. नायर आणि राजेश व्‍ही.आर्. यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांच्‍या संपत्तीच्‍या रक्षणाचे धर्मकार्य करणार्‍या केरळमधील अधिकवक्‍त्‍यांच्‍या गटाचे अभिनंदन ! असे गट हेच हिंदु धर्माची खरी शक्‍ती आहेत ! समस्‍त हिंदूंनी त्‍यांच्‍या कार्यात सहभागी होऊन त्‍यांना पाठिंबा दर्शवायला हवा !