दायित्व घेऊन सेवा करणार्या आणि भगवान शिव अन् संत यांच्याप्रती भाव असणार्या कु. स्मितल भुजले (वय ३३ वर्षे) !
‘मागील ५ वर्षांपासून कु. स्मितल भुजले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. फाल्गुन शुक्ल सप्तमी (१६.३.२०२४) या दिवशी कु. स्मितल भुजले यांचा ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यामध्ये साधकत्वाच्या दृष्टीने झालेला विकास, तसेच त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
कु. स्मितल भुजले यांना ३३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. दायित्व घेऊन सेवा करणे
रामनाथी आश्रमात अनेक कार्यक्रम होतात, उदा. मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या भेटी, लग्न, मुंज यांसारखे शुभ कार्य इत्यादी. या कार्यक्रमांच्या वेळी काढल्या जाणार्या छायाचित्रांचा अल्बम (संग्रह) संबंधितांना भेट म्हणून देण्यात येतो. हे छायाचित्रांचे अल्बम बनवण्याची सेवा स्मितलने अल्पावधीत शिकून घेतली. या कार्यक्रमांच्या छायाचित्रांचे अल्बम वेळेत बनवून द्यावे लागतात. या सेवेत समन्वयाचा भागही अधिक असतो. ती या सर्व सेवा, तसेच ‘मोठी रांगोळी काढणे, त्यासाठी अभ्यास करणे, सजावट करणे’ इत्यादी विविध सेवाही दायित्व घेऊन पूर्ण करते.
२. तिच्या सेवेत अकस्मात् पालट झाल्यास ती तो पालट आनंदाने स्वीकारते.
३. स्वतःला पालटण्याची तळमळ
ती तिच्या मनातील विचार वेळोवेळी योग्य साधकांना सांगते आणि त्यांच्याकडून साधनेचे योग्य दृष्टीकोन घेऊन सतत प्रयत्न करत असते. तिच्यात अंतर्मुखता असल्यामुळे ‘आपण कुठे न्यून पडतो ? काय प्रयत्न करायला हवेत ?’, हे तिच्या लक्षात येते आणि त्यासाठी ती प्रयत्नरत असते.
४. भगवान शिव आणि संत यांच्याप्रती भाव असणे
‘तिचा भगवान शिवशंकराप्रती अपार भाव आहे’, हे तिच्या अनेक कृतींतून लक्षात येते. तिने तिच्या संगणकासमोर कैलास पर्वताचे चित्र ठेवले आहे. तिच्याकडील वस्तूंवर बेलपत्र काढलेले असते. तिच्या अनेक वस्तू आणि पोषाख शिवतत्त्व दर्शवणार्या राखाडी किंवा पांढर्या रंगाच्या असतात. तिने काढलेल्या भावचित्रांत ‘ती शिवाच्या अनुसंधानात आहे’, अशा आशयाचे प्रसंग असतात. तिचा संत, सद्गुरु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीही पुष्कळ भाव आहे.
५. जाणवलेले पालट
५ अ. सहजता वाढणे
आरंभी स्मितल पुष्कळ अबोल होती. ती कोणामध्ये मिसळत नसे किंवा हसत नसे. ती एकटी रहात असे. आता ती आश्रमात चांगली रुळली आहे. ती साधकांशी स्वतःहून सहजतेने बोलते.
५ आ. इतरांचा विचार करणे : ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिला आश्रमात येईपर्यंत अधिक लोकांमध्ये वावरण्याची सवय नव्हती. आता ती आश्रमात राहिल्यामुळे ‘इतरांचा विचार करणे, इतरांना समजून घेणे, इतरांना प्रेम देणे’ इत्यादी कृती करत आहे. ती साधकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटी भेटवस्तू किंवा स्वतः बनवलेली कलाकृती भेट देते. हे सर्व ती साधकांना आनंद देण्यासाठी करत असते.
५ इ. ‘ती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि आनंदी झाली आहे’, असे मला वाटते.
‘भगवान शिवाने आम्हाला त्याच्या या पुत्रीच्या समवेत साधना करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी दिली’, याबद्दल आम्ही त्याच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सौ. नंदिनी नीलेश चितळे, ढवळी, फोंडा, गोवा. (८.३.२०२४)