प्राप्तीकर विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे अनेक करदात्यांची धावपळ उडाली !
पुणे – प्राप्तीकर विभागाकडून सध्या करदात्यांना चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांविषयी नोटिसा पाठवण्यात येत आहेत. विभागाने पाठवलेल्या वार्षिक माहिती विधानात (ए.आय.एस्.) अनेक करदात्यांचे व्यवहार शंभरपट अधिक दाखवण्यात आले असून त्यावरील आगाऊ करभरणा वेळेत करण्यास बजावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक करदात्यांची धावपळ उडाली आहे. अखेर प्राप्तीकर विभागाने ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत त्यात दुरुस्ती करण्याचे पाऊल उचलले आहे.
आपल्या खात्यावरील व्यवहार कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, याविषयी करदात्यांना काहीच माहिती मिळत नव्हती. यामुळे अनेक करदात्यांनी सनदी लेखापालांकडे धाव घेतली. सनदी लेखापालांकडे अनेक करदात्यांनी याविषयी तक्रारी केल्या. याचसह अनेक जणांनी प्राप्तीकर विभागाकडेही याची तक्रार केली. यानंतर प्राप्तीकर विभागाच्या निदर्शनास ही चूक आली. यावर प्राप्तीकर विभागाने आता चूक दुरुस्त करण्याची भूमिका घेतली आहे. करदात्यांचे वार्षिक माहिती विधान अद्ययावत् केले जाणार असून तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
याविषयी प्राप्तीकर विभागाने सांगितले की, आगाऊ कर भरण्याविषयी करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. एका संस्थेकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे करदात्यांना चुकीची नोटीस पाठवण्यात आली. (अशा संस्थेकडून प्राप्तीकर विभाग माहिती कशासाठी मागवतो ? या संस्थांकडून असे अन्य वेळीही होते का ? याचीही चौकशी करायला हवी ! – संपादक) या संस्थेला माहिती अद्ययावत् करण्यास सांगण्यात आले आहे. वार्षिक माहिती विधानातील माहिती अद्ययावत् केली जाईल. त्याआधारे करदात्यांना सुधारित माहिती पाठवली जाणार असून तोपर्यंत त्यांनी प्रतीक्षा करावी.
संपादकीय भूमिकाप्राप्तीकर विभागाकडून तांत्रिक चुका होणे अपेक्षित नाही. तांत्रिक चुका कशामुळे झाल्या आणि त्या दुरुस्त करण्यासाठी काय करणार ? हेही जनतेला समजले पाहिजे ! |