छत्रपती संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकास अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेले धर्मादाय आयुक्त कार्यालय !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील कन्नड गावात धर्मादाय आयुक्त कार्यालयात निरीक्षक पदावर कार्यरत असलेले श्रीदीप बागूल (वय ३९ वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडून अटक केली. ही घटना कन्नड तालुक्यातील कालीमठ फाट्यावर १२ मार्च या दिवशी सांयकाळी ५ वाजता घडली आहे.
चाळीसगाव येथील ५३ वर्षीय तक्रारदार यांच्याकडे कालीमठ ट्रस्ट (उपळा) येथील देवस्थानची गुप्त दान पेटी उघडून त्यातील दान रकमेचा हिशेब करून सदरची रक्कम विश्वस्तांच्या कह्यात देण्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर श्रीदीप बागूल यांना लाच घेतांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बागूल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.