निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल !
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांची चेतावणी
छत्रपती संभाजीनगर – स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार आहे. शिवसेना महिला पदाधिकार्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचे सक्षमीकरण करण्याविषयी ज्या विविध योजना चालू केल्या आहेत, त्याची माहिती स्थानिक महिलांपर्यंत पोचवण्यासाठी काम करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी केले आहे. त्या १३ मार्चला छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी येथील महिला पदाधिकारी बैठकीत बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
डॉ. गोर्हे पुढे म्हणाल्या की, महिलांची संख्या राजकारणात, तसेच समाजकारणात वाढत आहे. महिलांची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे दुष्काळात रोजगार हमी योजनेची कामे चालू होतील. यासंदर्भात आपण ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांना रोहयोच्या कामाची आणि शासन निर्णयाची माहितीही देण्याची सूचना डॉ. गोर्हे यांनी महिला पदाधिकार्यांना केली.