‘अभिनव भारत’चे कुलगुरु बाबाराव सावरकर !
आज ‘बाबाराव सावरकर यांचा स्मृतीदिन’ आहे. त्यानिमित्त विनम्र अभिवादन !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे देश स्वतंत्र करण्याची शपथ घेतली आणि ‘अभिनव भारत’ या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा प्रचार आणि प्रसार त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर, म्हणजेच बाबाराव सावरकर यांनी केला. तेच या संघटनेचे कुलगुरु ठरले. त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन करून हिंदु बांधवांना राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रीय दृष्टी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. हिंदु धर्म, संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास यांचा पारतंत्र्याच्या तिमिरात हिंदु बांधवांची मने चेतवण्यासाठी मशालीसारखा उपयोग केला.
१. ‘हिंदुस्थान हिंदूंचाच आहे’, हे हिंदु बांधवांच्या मनावर ठसवण्याचे कार्य बाबाराव यांनी करणे
हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. ही भूमी हिंदूंचे जन्मस्थान आणि निवासस्थान आहे. परकीय आक्रमकांनी हिंदूंची ही श्रद्धा आणि त्याविषयीचा इतिहास नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तेवढेच नाही, तर त्यांनी त्यांची संस्कृती आणि धर्म अत्यंत चलाखीने भारत देशाच्या भूमीत रुजवून वैचारिकदृष्ट्या या देशातील जनतेला इंग्रज बनवले. ‘परकीय आक्रमकांनी जरी या देशावर त्यांची राजकीय सत्ता प्रस्थापित केली असली, तरी ही भूमी त्यांची नाही. त्यांनी कितीही तसा दावा केला, तरी त्यांना या भूमीचे स्वामित्व बहाल करता येत नाही’, हा विचार बाबाराव सावरकर यांनी हिंदु बांधवांच्या मनावर ठसवण्यासाठी अपार कष्ट घेतले. ‘हिंदुस्थान, हिंदु संस्कृती आणि हिंदु धर्म अत्यंत प्राचीन आहे’, ही गोष्ट निर्विवादपणे पटवून दिली ती बाबाराव सावरकर यांनी !
२. परकियांच्या आक्रमणापूर्वी आणि आक्रमणाच्या नंतरचा इतिहास बाबाराव यांनी सांगणे
मुसलमानांनी जरी आक्रमण केले, तरी संपूर्ण हिंदुस्थान हिंदूंचे मूळ स्थान आहे. मुसलमानांनी आक्रमण करण्यापूर्वी हिंदुस्थानात हिंदू एकमताने नांदत होते. ‘मुसलमान धर्म अस्तित्वात येण्याआधी बुद्धाचा उदय झाला होता. बुद्ध काळापूर्वी महाभारत युद्धाचा काळ सहस्रावधी वर्षांपूर्वीचा आहे’, असे पुरातत्ववादी सांगतात. ही गोष्ट बाबाराव सावरकर यांनी त्यांच्या ‘राष्ट्रमीमांसा आणि हिंदुस्थानचे राष्ट्र स्वरूप’, या ग्रंथात ग्रंथित केली आहे. याच ग्रंथात ते लिहितात, ‘‘महाभारताच्या वेळी हिंदुस्थानात हिंदु संस्कृतीच्या तेजस्वी आणि उत्कर्षाचा मध्यान्हकाळ होता.’’ ‘या काळात मुसलमान धर्माचा उदय झालेला नव्हता’, हे या विधानाद्वारे बाबाराव स्पष्टपणे सांगू इच्छितात. ‘हिंदुस्थानात मुसलमानांचा प्रवेश होण्यापूर्वी हिंदु धर्म, हिंदु संस्कृती, हिंदूंची भाषा आणि हिंदु जाती वैभव संपन्नतेने नांदत होते’, याचे स्मरण करून देण्यास बाबाराव विसरत नाहीत.
मुसलमानांनी हिंदुस्थानच्या भूमीत प्रवेश केला आणि हिंदुस्थानच्या संस्कृतीच्या शरिरात विषारी सुरा खुपसला. त्यामुळे हिंदु राष्ट्राचा बराचसा भाग विषमय झाला. ख्रिस्त्यांनीसुद्धा हिंदु संस्कृतीच्या शरिराच्या अन्य भागात असाच विषारी सुरा खूपसून हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण या प्रयत्नात त्यांना यश प्राप्त झाले नाही. या पीडित शरिरात नवजीवन देणारे रसायन आहे. या रसायनाने ते शरीर पुन्हा त्या मारक अशा विषारी वस्तूंना निर्वीर्य करून बलवान बनले. हा सारा इतिहास बाबाराव हिंदु बांधवांना सांगत होते. त्यासाठी ‘अभिनव भारत’ ही संघटना ‘राष्ट्रीय शिक्षण देणारे विद्यापीठ’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि या ‘विद्यापिठाचे कुलगुरु’ म्हणून बाबाराव सावरकर सर्वत्र संचार करत होते.
३. बाबाराव यांनी इस्लामी मौलवीला (इस्लामचे धार्मिक नेते) धर्मग्रंथाच्या सूत्रावरून निरुत्तर करणे
‘आपण कोण आहोत ?’, याचा विसर हिंदु बांधवांना पडला होता. बाबारावांनी मात्र हिंदु बांधवांना स्वतःचा परिचय करून दिला. एवढेच नव्हे, तर इस्लामी मौलवींशी प्रतिवाद करून त्यांना निरुत्तर केले. अंदमानच्या कारागृहात हिंदूंना त्रास देऊन आणि फसवून मुसलमान करणार्या मुसलमानांपैकी एका मौलवीची गाठ बाबारावांशी पडली. तो सतत कैद्यांशी कुराण आणि इस्लामी धर्ममत यांची स्तुती करत होता. अशी स्तुती करत असतांनाच तो हिंदु धर्माची थट्टाही करत होता. एकदा तो बाबारावांना म्हणाला, ‘‘आमचा जसा धर्मग्रंथ कुराण, ख्रिस्त्यांचा धर्मग्रंथ बायबल, तसे तुमच्या धर्माचे पुस्तक कोणते ? तुम्हाला निश्चितपणे हाच आमचा धर्मग्रंथ असे सांगता येणार नाही. तुमच्याकडे सहस्रावधी ग्रंथांचा बाजार आहे.’’
बाबाराव त्याला म्हणाले, ‘‘मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मग केव्हा तरी देईन; पण मला एक अडचण आली आहे, तेवढी विचारायची आहे. आपण सर्वजण सामान्य गरीब लोक आहोत. कुणाला मोठे घर, कुणाला लहान घर, तर कुणाला झोपडीत रहावे लागते. आपण दरिद्री ! आपल्याला अढळ निवासस्थान कुठून लाभणार ? हो कि नाही ? एखादा मोठा असला समजा, तुम्ही तुर्कस्तानचा खलिफा आहात, त्याला किती निवासस्थाने असतील बरे ? तुम्ही सांगू शकाल का ?’’ बाबारावांच्या या प्रश्नाचे उत्तर देतांना तो मौलवी आनंदित होऊन म्हणाला, ‘‘अहो मोठमोठे राजे आणि नबाब हेसुद्धा आमच्या तुर्कस्तानच्या खलिफाशी बरोबरी करू शकणार नाहीत. त्यांच्या निवासस्थानाची मोजदाद करताच येणार नाही. त्याची प्रत्येक गोष्ट मोठी. टोलेजंगवाडे.’’ बाबाराव शांतपणे त्याला म्हणाले, ‘‘याचा अर्थ गरीब माणसाचे केवळ एकच घर असते; पण खलिफाची मात्र अनेक घरे असतात. तो सुद्धा ‘माझे एकच घर आहे’, असे म्हणू शकत नाही. हो कि नाही ?’’ मौलवी आनंदाने म्हणाला, ‘‘होयच मुळी.’’ ‘‘तुम्ही जे धर्म धर्म म्हणून म्हणता, त्या सर्व गरिबांच्या गोष्टी आहेत. तुम्हाला एखादे झोपडे धर्माचे म्हणून दाखवता येते; पण हिंदु धर्म महान सम्राट आहे. तो ‘माझ्याकडे माझ्या धर्माचा एकच ग्रंथ आहे’, असे म्हणू शकत नाही. त्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्याची ग्रंथसंपदा ही अनंत आहे.’’
बाबाराव असे म्हणताच तो मौलवी निरुत्तर झाला. वास्तविक ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेच्या कुलगुरूने इस्लामी धर्मगुरूला बौद्धिक थप्पड मारून ताळ्यावर आणले.
४. बाबाराव सावरकर यांनी वर्णिलेली हिंदु धर्माची महती
‘ज्या धर्मानुष्ठानाने, धर्माचरणाने, धर्मपालनाने ऐहिक अभ्युदय मिळवता येतो, तोच धर्म अभ्युदय मार्गाचा अवलंब करून निष्क्रीय यशाची वाटचाल करता येते, अशी शिकवण देतो. असा धर्म हा केवळ हिंदु समाजालाच नव्हे, तर संपूर्ण मानवी समाजाला एक विशिष्ट तत्त्वज्ञान सांगतो. त्या समाजाची रचना, त्या समाजाच्या विशिष्ट तत्त्वज्ञानाला अनुरूप असते. जगाकडे पहाण्याची त्या समाजाची दृष्टी त्या धर्माचे तत्त्वज्ञान आणि दृष्टीकोन यांनुसार झालेली असते. असा हा हिंदु धर्म आपल्या ऋषिमुनींनी अविनाशी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभा केला आहे. हिंदु धर्माने सुदीर्घ काळ व्यापला आहे. हिंदु धर्माची व्याप्ती अनंत आहे. त्याची मोजदाद करण्यासाठी सर्व मोजपट्ट्या न्यून पडतील’, अशा शब्दांत बाबाराव सावरकर हिंदु धर्माची महती गात हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांची ओळख करून देतात.
५. क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ बाबाराव सावरकर !
बाबाराव यांची ही शिकवण राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ पिढ्यान्पिढ्या सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या नंतरच्या पिढीतील क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ म्हणून बाबाराव यांच्याकडे आपण निर्देश करू शकतो. म्हणूनच त्यांना ‘अभिनव भारतचे कुलगुरु’ ही उपाधी शोभून दिसते.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२.३.२०२४)