विकृत अंधानुकरण !
सामाजिक माध्यमावरील एक व्हिडिओ पाहून मन खिन्न झाले. एक तरुणी दुसर्या तरुणीला भर उन्हात रस्त्यावरून, अर्धनग्न अवस्थेत, गळ्यात पट्टा घालून, कुत्र्यासारखे ओढत नेतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. केवढी ही मनोविकृती ! सामाजिक माध्यमात व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी या तरुणींनी ही (वि)कृती केली आहे. खडबडीत रस्त्यावरून तिला कुत्र्यासारखे ओढत नेतांना दुसरी तरुणी मात्र स्वतःच्या पायात उंच टाचेचे बूट घालून आणि ऊन लागू नये; म्हणून डोक्यावर गोल टोपी घालून मिरवतांना यात दिसत आहे ! किती असभ्य, अश्लील, माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे हे ! या प्रकारचे पाश्चात्त्यांचे काही व्हिडिओ यापूर्वी प्रसारित झाले होते. प्रसिद्धीसाठी किंवा ‘स्टंट’ म्हणून केलेले हे कृत्य, म्हणजे केवळ पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण आहे. पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी केलेली ही मनोविकृत कृती आहे. पाश्चात्त्य विकृतीचे असे अंधानुकरण, म्हणजे अधोगतीला नेणारे, विनाशाच्या दिशेने पडणारे पाऊलच म्हणावे लागेल.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते, ती पूजनीय असते. असे म्हणतात की, जिथे महिलांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे, ‘जगातील प्रत्येक स्त्रीला सर्वोच्च सन्मान द्यायला हवा.’ कुठे स्त्रियांची पूजा करणारी संस्कृती आणि कुठे हे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण ? नवरात्रीत नारीशक्तीच्या घोषणा दिल्या जातात. स्त्रीच्या कर्तृत्वाची नोंद घेऊन पुरस्कार वाटले जातात ! नुकताच ‘महिलादिन’ही झाला. महिलेनेच महिलेची अशी विटंबना करणे, हे किती निंदनीय आहे ! भारत आणि भारतीय संस्कृती दोन्ही महान होते, आहेत अन् रहातील; पण ती टिकवण्यासाठी आपण त्यानुसार आचरण करायला हवे. आताच्या पिढीने धर्माचरण केले, हिंदु संस्कृती टिकवली, तरच पुढची पिढी तिला बघून शिकेल आणि अनुकरण करेल. पूर्वी बायका डोक्यावरून साडीचा पदर घ्यायच्या. आताच्या महिलांचा कल न्यून कपडे परिधान करण्याकडेच अधिकाधिक असतो. त्याचेच प्रत्यंतर या व्हिडिओतही येते. सध्या माणूस इतका स्वार्थी झाला आहे की, तो माणसाला माणूस म्हणून बघायला सिद्ध नाही. पैसा, प्रसिद्धी, वर्चस्व गाजवण्यासाठी तो काहीही करायला सिद्ध असतो. अगदी स्वतःच्या जवळच्या व्यक्तींनाही तो काही ना काही तरी करून दुखावत असतो. अशा व्हिडिओमध्ये झालेली स्त्रीत्वाची क्रूर विटंबना पहावत नाही. महिला मुक्ती संघटना, महिला बचाव कार्यकर्त्या यांना हे दिसत नाही का ? भारतात लोकशाही आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे; म्हणून अशा प्रकारचे विकृत वर्तन करणे, हे सर्वथा अयोग्यच ! मानवी संस्कृतीकडून ‘प्राणी संस्कृती’कडे जाण्याच्या या प्रवाहांना कुणीतरी अडवले तर पाहिजेच; अन्यथा आपण पाश्चात्त्यांच्या विकृृतीची गुलामगिरी ओढवून घेत आहोत, असे होईल !
– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.