देशातला सर्वोत्तम ‘सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म’ राज्यात होणार !- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकणातील पायाभूत सुविधा, नवीन मानक तयार करण्यावर भर दिला जाणार


रत्नागिरी – न्यायवैद्यकमध्ये (फॉरेन्सिकमध्ये) राज्याला नंबर एक आणणार आहोत. बँका, नॉन बँकींग फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर, रेग्युलेटर, सोशल साईट्स एकाच प्लॅटफॉर्मवर असतील. सायबर गुन्हा घडला विशेषतः पैशाविषयी घोटाळ्याची घटना घडली की, तासाभरात पैसे परत मिळतील, असा चांगला प्लॅटफॉर्म करण्याचे काम चालू आहे. हा देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानक तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस वसाहत नूतन इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,

१. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे. सायबर सुरक्षा देण्याचे काम होत आहे.

२. काजू उत्पादकांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय केला आहे.

३. सर्व सामान्यांचा विचार करणारे आपले सरकार आहे. बचत गटाचे भांडवल दुप्पट केले आहे. महिलांच्या हातांना रोजगार देण्याचे काम, त्यांना सक्षम करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘शक्तीवंदना’च्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यातल्या बचत गटांना मिळलेल्या २३५ कोटी रुपयांमधून महिला अत्यंत वेगाने रोजगारविषयक काम चालू करतील. त्यातून त्या सक्षम होतील.
या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यशासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्याचा चेहरा-मोहरा पालटण्याचे काम होत आहे. गोव्याच्या धर्तीवर राज्यशासन काजू उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेत आहे.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असतांना प्रशासकीय इमारतीसाठी निधी संमत केला होता. याचे लोकार्पणही आपल्या हस्ते व्हावे. रत्नागिरीत ‘जेम्स अँड ज्वेलरी’चे प्रशिक्षण केंद्र होत आहे. त्यामधून ३५ सहस्र ते २ लाखांपर्यंत युवकांना रोजगार मिळणार आहेत. डिफेन्स क्लस्टरचा सामंजस्य करारही रत्नागिरीत करावा.