समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे ! – वीणा लेले
अधिवक्ता परिषद आणि दि यश फाऊंडेशन यांच्या वतीने महिला सन्मान सोहळा
रत्नागिरी – समाजाला आरोग्ययंत्रणेतील नर्सेसची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला आणि आता केळ्ये येथे १६० व्यक्तींकरता वृद्धाश्रम चालू होणार आहे, असे प्रतिपादन स्वगृही वृद्धाश्रमाच्या संस्थापिका वीणा लेले यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त दि यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग आणि अधिवक्ता परिषद (कोकण प्रांत) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलादिन समारोहाप्रसंगी त्या बोलत होत्या. जे.के. फाईल्स येथील ‘रॉयल हॉल’मध्ये कार्यक्रम झाला. रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता विलास पाटणे, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता भाऊ शेट्ये, अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या अधिवक्त्या प्रिया लोवलेकर आणि अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
या वेळी जिल्हा रुग्णालयात ए.एन्.एम्., जी.एन्.एम्. (नर्सिंग कोर्स) चालू करण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांनी मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. नर्सिंगमध्ये अद्ययावत शिक्षण घेतले पाहिजे. कोकणला नर्सिंगची चांगला वारसा आहे. बाळ माने यांच्या यश फाऊंडेशनमध्ये नर्सिंग कॉलेज चांगल्या प्रकारे चालू असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा सादर केल्या. यामध्ये राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर, कल्पना चावला, किरण बेदी आदींसह महिलांचा समावेश होता.