स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

भांडुप (मुंबई) येथे युवतीसांठी शौर्य प्रशिक्षण शिबिर !

शिबिराला उपस्थित युवती

भांडुप (मुंबई) – सद्यःस्थितीत महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. पोलीस आणि प्रशासन प्रत्येक वेळी आपल्या रक्षणासाठी पोचेलच, असे शक्य नाही. वाईट प्रसंग कधीही ओढवू शकतो. त्या प्रसंगातून वाचण्यासाठी प्रत्येक युवती आणि महिला यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण येणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी येथे केले. येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी ‘भारताचा शौर्यशाली इतिहास’ या विषयावर समितीच्या कु. सिद्धी बाळे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात पुष्कळ युवती सहभागी झाल्या होत्या. मार्गदर्शनानंतर शिबिरामध्ये स्वसंरक्षणाची पद्धत आणि विशेष प्रतिकाराचे प्रसंग शिकवण्यात आले.

अभिप्राय

१. कु. सुरभी शिंत्रे – चित्रपटांमध्ये एक व्यक्ती १० जणांचा प्रतिकार करते, तसे आपल्याला जमेल का ? असे वाटायचे; पण हे शिबिर पाहून ‘आपण प्रशिक्षित असू, तर प्रतिकार करू शकतो’, हे लक्षात आले.

२. सौ. सारिका विचारे – इतिहासातील ठाऊक नसलेली उदाहरणे समजली. मुलांना हा शौर्यशाली इतिहास माहीत असायला हवा.

३. श्री. तेमूलकर – अशी शिबिरे होणे ही काळाची आवश्यकता आहे.

वैशिष्ट्यपूर्ण – शिबिराला ५ प्रशिक्षणार्थींसह त्यांचे पालकही आले होते.