पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात संपूर्ण दिवस मुखदर्शन चालू ठेवण्याची हिंदु महासभेची मागणी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – १५ मार्चपासून श्री विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाच्या सुशोभिकरणासाठी मंदिरातील पदस्पर्श दर्शन बंद होणार असल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. स्थानिक व्यापारी, दुकानदार यांची उपासमार होणार आहे. मंदिर समितीने या निर्णयाचा फेरविचार करून मुखदर्शन तरी किमान दिवसभर ठेवावे, या मागणीसाठी हिंदु महासभेच्या शिष्टमंडळाने श्री विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची भेट घेतली. कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी गैरसोयीचा विचार करण्याचे आणि जीर्णाेद्धाराचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
सुशोभिकरणाच्या नावाखाली मंदिरात वेळोवेळी नियुक्तीला असलेले अधिकारी आणि समितीने मंदिराचे पुरातन वैभव नष्ट केले. आता पुन्हा मंदिराला पुरातन वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने दिलेला ७३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. ‘आतातरी पूर्ण विचार करून प्राचीन वास्तूशास्त्र आणि मूर्तीशास्त्र यांचा अभ्यास असणार्या तज्ञांचा सल्ला घेऊन काम करावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
श्री. शेळके म्हणाले की, आम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन काम करू. गाभार्यातील ग्रॅनाईट आणि खाली बसवलेली फरशी काढतांना धूळ, फरशीचे तुकडे, माती उडण्याची शक्यता विचारात घेऊन नियोजन केले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोचणार नाही, याची दक्षता घेणार आहोत. हे काम काळजीपूर्वक करावे लागणार असल्याने वेळ लागेल. तरीही आम्ही लवकर काम संपवून दर्शन पूर्ववत् चालू करू. याप्रसंगी हिंदु महासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी, अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, पत्रकार महेश खिस्ते, विवेक बेणारे, गणेश लंके आदी उपस्थित होते.