सातारा येथे वाळू तस्करांची ८० वाहने शासनाधीन !
४ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड !
सातारा, १४ मार्च (वार्ता.) – वाळू तस्करांवर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद असून त्यांची ८० हून अधिक वाहने पोलिसांनी कह्यात घेतलेली आहेत. जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते १ मार्च २०२४ या कालावधीत अवैध वाळू आणि मुरुम, माती, दगड यांसारख्या इतर गौण खनिज उत्खननाची १८४ प्रकरणे उघड झाली आहेत. या माध्यमातून संबंधित तस्करांना ४ कोटी ४१ लाख ८१ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
एकूण दंडापैकी १ कोटी ८६ लाख ४९ सहस्र रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच तस्करीच्या प्रकरणी ६ जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. वाळू किंवा गौण खनिजाची तस्करी करणारे जुनी वाहने उपयोगात आणतात. ही वाहने सोडवण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे संबंधित पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात ही वाहने मोठ्या संख्येत पडून असतात. अशा वाहनांचा लिलाव केला जातो; मात्र ही प्रक्रिया संथ गतीने राबवली जाते. या काळात वाहनांचे आरशापासून ते अगदी इंजिनपर्यंत भाग नाहीसे होतात. (पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांचे भाग चोरीस जात असतील, तर अन्य ठिकाणचे काय ? पोलिसांची निष्क्रीययता आणि अकार्यक्षमताच यानिमित्ताने दिसून येते. – संपादक)