आंबेगाव (पुणे) येथे महाशिवरात्रीच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान !

मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर

आंबेगाव (जिल्हा पुणे) – ‘शिव शंभो युवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून चिंचोली (देशपांडे), लांडेवाडी, आंबेगाव येथे ३ दिवसांचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. याचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि गावातील धर्माभिमानी यांच्या साहाय्याने ५ मार्च या दिवशी येथे मंदिर स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे गावकर्‍यांकडून पुष्कळ कौतुक करण्यात आले. ‘अन्य गावांतून समितीचे कार्यकर्ते आपल्या गावात येऊन आपले मंदिर स्वच्छ करत आहेत’, हे बघून त्यांच्या मनात समितीविषयी पुष्कळ आदराची भावना निर्माण झाली. या उत्सवामध्ये येथील धर्माभिमानी श्री. राजेंद्र शेवाळे यांच्या सहकार्यामुळे गावात ३ दिवस प्रवचन घेण्याची संधी मिळाली. १० मार्चला हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘महिलांवरील अत्याचार आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी ३५० ते ४०० जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर कक्षावर धर्मशिक्षणवर्गाची मागणी उत्स्फूर्तपणे नोंदवली गेली.

मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित जिज्ञासू

७ मार्चला सौ. स्मिता बोरकर यांनी ‘शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व आणि आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थितांकडून भगवान शिवाचा सामूहिक नामजप करून घेतला. सर्वांना नामजपातून आनंद आणि शांती अनुभवता आली.

८ मार्चला समितीचे श्री. पराग गोखले यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थितांकडून भगवान शिवाचा सामूहिक नामजप करून घेतला.

विशेष

१. ‘महान हिंदु धर्माचे ज्ञान आम्हाला यापूर्वी कधी मिळाले नव्हते. तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाले’, असा अभिप्राय अनेक महिलांनी दिला.

२. धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.

३. येथे २ दिवस धार्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते.