जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांत अहिंदूंचे वर्चस्व असतांना हिंदूंनी आपल्या हिंदु धर्माविषयीच आग्रही भूमिका का ठेवावी ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
‘जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांतील वर्चस्वाचा विचार करतांना त्याची धार्मिक निकषांवर वर्गवारी करता येणार नाही. अमुक एका धर्माचे बौद्धिक वा आर्थिक वर्चस्व असे म्हणता येणार नाही. तथापि हिंदूंनी प्रामाणिकपणे, तेजस्वीपणे आपला धर्म सांभाळला, तरी या सर्व क्षेत्रांत ते वर्चस्व निर्माण करू शकतात. |
१. बौद्धिक, आर्थिक, विज्ञान आणि लष्कर यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था श्रेष्ठ हिंदु धर्मामध्ये !
जागतिक स्तरावर समस्त मानवजातीचा विचार करतांना पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने विज्ञानाप्रमाणेच बौद्धिक, आर्थिक आणि लष्करी वर्चस्वाला जर धर्माचे नियंत्रण नसेल, तर या एकेक सत्ता जर अनियंत्रित राहिल्या, तर त्या मानवाला विनाशाकडेच नेतील, यात काही शंका नाही. मानवाच्या कल्याणासाठी बौद्धिक, आर्थिक, विज्ञान आणि लष्कर या चारही गोष्टींवर उत्तम नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपल्या या श्रेष्ठ हिंदु धर्मामध्ये आहे. त्या धर्माचे सम्यक ज्ञान हिंदूच करून देऊ शकतात; म्हणून आपण हिंदूंनीच स्वत:च्या धर्माचा आग्रह धरणे, हे अंततः मानवाच्या परमकल्याणाचे ठरणार आहे.
२. हिंदु धर्म हा समस्त मानवाच्या कल्याणासाठीच !
आपला हिंदु-आर्य धर्म हा कधीही बळजोरीने वाढलेला नाही. आपल्याकडे धर्मयुद्ध, म्हणजे युद्धाचा धर्म असे आहे. धर्मांतरासाठी युद्ध आपण कधीही केलेले नाही. एक आपलाच देश असा आहे की, ज्यामध्ये इतर धर्मीय सुखासमाधानाने नांदत होते. जगाचा गेला कित्येक सहस्रकांचा इतिहास साक्षी आहे. हिंदु धर्म हा समस्त मानवाच्या कल्याणासाठीच असल्याने त्याचा आग्रह धरण्यात गैर वा चुकीचे किंवा लाजिरवाणे असे काहीही नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)