सांगली येथील मुसलमान दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादित करू नये ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन
सांगली, १४ मार्च (वार्ता.) – ‘मुसलमान दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादित करू नये अन्यथा महापालिकेला न्यायालयात खेचण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली आहे.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय टोने, शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू जाधव, शहराध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष श्री. संभाजी पाटील, खणभाग विभाग अध्यक्ष श्री. अवधूत जाधव, सांगलवाडी विभागाध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, मिरज शहर अध्यक्ष श्री. सोमनाथ गोठखिंडे, मिरज शहर उपाध्यक्ष श्री. राहुल जाधव, ज्येष्ठ पदाधिकारी सर्वश्री दत्तात्रय भोकरे, धनंजय खाडीकर, भूषण गुरव, गणपत गायकवाड, नारायण हांडे, बबन मोरे आदी उपस्थित होते.
नितीन शिंदे म्हणाले की,
१. शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा जागामालकाने प्लॉट पाडून विक्री केलेली आहे, तसेच विकत घेतलेल्या प्लॉटधारकांनी गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेत आवेदन केले आहेत.
२. मूळ जागामालकांनी अनधिकृतपणे विक्री केलेली जागा महापालिकेने मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या दफन विधीसाठी भूसंपादित करू नये.
३. या जागेच्या व्यवहारामध्ये अंदाजे १६ कोटी रुपये किमतीचा घोटाळा होणार आहे. त्यात सहभागी असलेले मुसलमान समाजाचे नेते काही लोकांना या जागेकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासंदर्भात पहाणी करतात, तर दुसरीकडे मुसलमान समाजाच्या मौलवींना पाठवून जिल्हाधिकार्यांना निवेदन देतात.
४. मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाला दफन विधीसाठी जागा मिळण्यास आमचा विरोध नाही. ही जागा दफनभूमीसाठी योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी या जागेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.
५. महानगरपालिकेची लूट न होता मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाला चांगली जागा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू; पण आमचा विरोध या जागेच्या आडून होणार्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याला आहे.
‘तो पैसा जनतेचा आहे म्हणून आम्ही भूसंपादन प्रक्रियेला विरोध करत आहोत. तरी महापालिकेने या वादग्रस्त जागेचे भूसंपादन करू नये अन्यथा संबंधित अधिकार्यांना न्यायालयात खेचून त्यांच्या वेतनातून हे पैसे वसूल करू’, अशी चेतावणी नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी दिली.