गृहकलह माजवणारे केजरीवाल !
आम आदमी पक्षाचे (आपचे) संयोजक आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतांना ‘जर तुमचा नवरा मोदी-मोदी म्हणत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या, त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागेल’, असे सांगत निवडणुकीत महिला मतदारांना आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी घोषित केलेल्या योजनेचा आधार घेत ‘‘आपल्या लाभासाठी काम करणार्या व्यक्तीला मतदान करा’ हे पटवून देण्याचे दायित्व आपले आहे’’, असेही ते म्हणाले. हा एक प्रकारे भावनिक स्तरावर आर्थिक स्वातंत्र्याचे आमीष दाखवून महिला मतदारांना ‘ब्लॅकमेल’ (भावनिक आवाहन) करण्याचाच प्रयत्न नव्हे का ? ‘मुख्यमंत्री’ या अतीमहत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे अजब आवाहन करणे विस्मयकारक आहे. अशा प्रकारचे जनतेला आवाहन करतांना एक प्रकारे केजरीवाल घराघरांमध्ये कलहसदृश स्थिती निर्माण करत आहेत, ज्याची परिणती कौटुंबिक वातावरण गढूळ करण्यात निश्चितच होऊ शकते.
सद्यःस्थितीला भारतीय कुटुंबांमध्ये काही ना काही कारणाने संघर्ष चालू आहेत. त्यातच स्त्री-पुरुष दोघेही अर्थार्जनासाठी काम करत असल्याने त्यांच्यातील परस्पर संवाद न्यून झाला आहे. भ्रमणभाषचा अतीवापर, मानसिक अस्वास्थ्य अशा आणि अन्य अनेक कारणांमुळे घरे अशांत बनली आहेत. कुटुंबव्यवस्था पूर्णतः मोडकळीस येण्याची शक्यता असतांना त्यात भर म्हणून निवडणुकांवरून घरात भांडणे लावण्याचा हा प्रकार कशाला ? प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य असतांना मत देणे अथवा न देणे याविषयी अशा प्रकारे दबाव टाकण्याचा सल्ला देणार्या केजरीवालांची मानसिकता कशी आहे पहा ! आपल्या लाभासाठी केजरीवाल देहलीतील प्रत्येक घरामध्ये वाद निर्माण करू पहात आहेत ! यातून कदाचित् पक्षाचा लाभ होईल किंवा नाही, हे ठाऊक नाही; मात्र समाजाची पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी होईल. राज्याचा विकास किंवा विनाश हा सर्वस्वी शासनकर्त्यांवर अवलंबून असतो. त्यांनी आपण गेल्या ५ वर्षांत राज्यात केलेल्या विधायक, तसेच लोककल्याणकारी कार्याचा आलेख जनतेसमोर मांडावा. त्याऐवजी ते असे अजब सल्ले माता-भगिनींना देत आहेत.
‘समाजातील पावित्र्याचे रक्षण करणे, हे राज्यव्यवस्थेचे कर्तव्य आहे’, असे आर्य चाणक्य म्हणत. अर्थात् केजरीवालांचे उपरोक्त कथन आर्य चाणक्यांच्या ज्ञानाच्या पूर्णतः विपरीत आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.