परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !
‘वर्ष २००३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज आश्रमात वास्तव्याला असतांना प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी (माझी आई) त्यांना भेटण्यासाठी मिरजेला गेल्या होत्या. १८.८.२००३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. फडकेआजी यांच्याविषयी कृपाशीर्वादरूपी लिखाण एका कागदावर केले आणि ते प.पू. फडकेआजींच्या खोलीत येऊन त्यांना वाचून दाखवले. गुरुदेवांनी तो कागद प.पू. फडकेआजींच्या हातात दिला. त्या कागदावर गुरुदेवांनी लिहिले आहे, ‘८.७.२००३ ते १८.८.२००३ या कालावधीत पू. फडकेआजींची २ टक्के आध्यात्मिक प्रगती झाली. एरव्ही त्यांची वर्षाला ५ टक्के प्रगती होते. सर्वसाधारण साधकाची वर्षाला १ टक्का प्रगती होते.’
ते आठवल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. फडकेआजींची वर्षाला ५ टक्के आध्यात्मिक प्रगती कशी होत असावी ?’ तेव्हा मला प.पू. फडकेआजींच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे स्मरण झाले. ते प्रसंग आठवल्यावर मला या प्रश्नाचा उलगडा झाला. येथे दिलेल्या प.पू. फडकेआजींशी संबंधित प्रसंगांतून त्यांच्यातील साधनेची तळमळ आणि भाव किती उच्च प्रतीचे होते, ते लक्षात येते. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती गतीने झाली. येथे दिलेली त्यातील काही सूत्रे सर्वांनाच शिकण्यासारखी आहेत.
(भाग १)
१. नवस पूर्ण करण्याची प.पू. फडकेआजींची जाणवलेली तळमळ, चिकाटी आणि देवावरील दृढ श्रद्धा !
‘वर्ष १९७० मध्ये प.पू. फडकेआजी (माझी आई) एका वैयक्तिक कारणासाठी गणपतीला नवस बोलल्या होत्या. त्यासाठी त्या प्रतिदिन शिवाजी पार्क (दादर) येथे असलेल्या गणपति मंदिरात जाऊन गणपतीला २१ प्रदक्षिणा घालत असत. एकदा घरी दिवसभर पाहुणे असल्यामुळे त्या ते विसरल्या. रात्री ९.४५ वाजता त्यांना ‘आज मी मंदिरात गेले नाही’, याची जाणीव झाली. त्या मला म्हणाल्या, ‘‘तू माझ्या समवेत चल. आपण दोघी मंदिरात जाऊया. माझ्या आजच्या प्रदक्षिणा राहिल्या आहेत.’’ मी लहान (९ वर्षांची) असल्याने त्यांना म्हणाले, ‘‘आता रात्र झाली आहे. उद्या जाऊया का ?’’ तेव्हा मला ‘नवस म्हणजे काय ?’ हेही कळत नव्हते.’’ प.पू. फडकेआजी म्हणाल्या, ‘‘नको. त्या त्या दिवशीच ते पूर्ण करायचे असते.’’ आमच्या निवासास्थानापासून गणपति मंदिर चालत २० मिनिटांच्या अंतरावर होते. तेवढ्या रात्री आम्ही मंदिरात गेलो. प.पू. फडकेआजींनी प्रदक्षिणा पूर्ण करेपर्यंत रात्रीचे ११ वाजले. त्या काळी इतक्या रात्री मार्गावर कुणीच नसायचे. या प्रसंगातून रात्रीची वेळ असून प.पू. फडकेआजींची नवस पूर्ण करण्याची तळमळ, चिकाटी आणि देवावरील दृढ श्रद्धा दिसून आली.
२. साधनेची तीव्र तळमळ !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांतील सूत्रे घरी आल्यावर पुन्हा सुवाच्च अक्षरात लिहून काढणे : वर्ष १९९० मध्ये प.पू. फडकेआजींनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. तेव्हा त्यांचे वय ६१ वर्षे होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मावरील अभ्यासवर्ग घ्यायचे. अभ्यासवर्गाहून घरी आल्यानंतर प.पू. फडकेआजी त्यातील काही सूत्रे सुवाच्च अक्षरात लिहून ठेवत असत. त्या ती सूत्रे अन्य साधकांना वाचायला देत किंवा बारसे, हळदी-कुंकू यासारख्या घरगुती समारंभात छोटे प्रवचन करून किंवा साप्ताहिक सत्संगात प्रसंगानुसार त्यातील सूत्रे सांगत असत.
२ आ. नातवंडे किंवा नातेवाईक यांच्या मायेत न अडकता प्रत्येक रविवारी परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गाला जाणे : प.पू. डॉक्टर घेत असलेला अभ्यासवर्ग रविवारी असायचा. तो सुटीचा दिवस असल्याने काही वेळा नातेवाईक घरी यायचे किंवा मी माझ्या मुलांना घेऊन आईकडे (प.पू. फडकेआजींकडे) यायचे. तेव्हा माझा मुलगा (श्री. निनाद गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३६ वर्षे) ३ वर्षांचा होता. प.पू. फडकेआजी अभ्यासवर्गाला जायला निघाल्यावर तो ‘आजी, तू बाहेर जाऊ नको’, असे म्हणत पुष्कळ रडायचा; पण त्या कधीही भावनेत अडकल्या नाहीत. ‘नातवंडांच्या प्रेमापोटी त्या अभ्यासवर्गाला गेल्या नाहीत’, असे कधीच झाले नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि १०० टक्के आज्ञापालन करणार्या प.पू. फडकेआजी !
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गात मृत व्यक्तीचे छायाचित्र घरात न लावण्यामागचे शास्त्र सांगितल्यावर स्वतःच्या निधन झालेल्या मुलाचे घरात लावलेले छायाचित्र काढून ठेवणे आणि यजमानांनी विरोध केल्यावर त्यांना त्यामागील शास्त्र समजावून सांगणे : प.पू. डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गात ते जसे सांगतील, त्याप्रमाणे लगेच प्रत्येक कृती करून प.पू. फडकेआजींनी त्यांचे आज्ञापालन केले. एका अभ्यासवर्गात प.पू. डॉक्टरांनी ‘घरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावल्यामुळे मृत व्यक्ती आणि घरातील कुटुंबीय एकमेकांमध्ये अडकून रहातात. त्यामुळे मृत व्यक्तीला पुढची गती मिळत नाही’, असे सांगितले. वर्ष १९७५ मध्ये प.पू. फडकेआजींच्या मोठ्या मुलाचे (कै. अभय फडके याचे) वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले होते. अभ्यासवर्गाहून घरी आल्यावर केवळ अर्ध्या घंट्यात प.पू. फडकेआजींनी मुलाचे भिंतीवर लावलेले छायाचित्र काढून ठेवले. माझ्या वडिलांनी ((कै.) नारायण फडके यांनी) त्यांना ‘मुलाचे छायाचित्र पुन्हा लाव’, असे ८ दिवसांत अनेक वेळा सांगितले. तेव्हा प.पू. फडकेआजींनी स्थिर राहून मुलाचे छायाचित्र न लावण्यामागचे आध्यात्मिक कारण त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर वडील शांत झाले.
४. सेवेची तळमळ !
४ अ. रिक्शावाल्यांनाही साधना आणि नामजप सांगून कृतीप्रवण करणे : प.पू. फडकेआजींना ‘समाजातील सर्वांपर्यंत सनातनचे कार्य पोचावे’, अशी पुष्कळ तळमळ होती. त्यामुळे त्या जी व्यक्ती भेटेल, तिला सनातनचे कार्य सांगायच्या. मुंबई आणि पुणे येथे रहात असतांना अनेकदा त्यांना रिक्शाने प्रवास करावा लागत असे. रिक्शात बसल्यापासून उतरेपर्यंत त्या रिक्शावाल्यालाही साधना अन् नामजप यांविषयी सांगत असत. प.पू. फडकेआजी रिक्शातून उतरतांना तो रिक्शावाला त्यांना म्हणायचा, ‘‘मी आता नामजप चालू करतो.’’
प.पू. फडकेआजींमधील तळमळीमुळेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती अल्प कालावधीत कृतीप्रवण होत असत.
४ आ. दादर ते नागपूर या प्रवासात रेल्वेच्या डब्यात फिरून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २५ अंकांचे वितरण करणे : वर्ष १९९९ मध्ये प.पू. फडकेआजी नागपूर येथील त्यांच्या नातेवाइकांकडे गेल्या होत्या. या प्रवासात त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २५ अंकांचे वितरण केले. त्यांनी सहप्रवाशांना साधनेचे महत्त्व सांगून अर्पणही मिळवले. प.पू. फडकेआजी नागपूरहून परत आल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला रेल्वेत फिरायला कसे जमले ? एका डब्यातून दुसर्या डब्यात जाण्यासाठी असलेल्या जागेवर गाडी पुष्कळ हलते.’’ त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर माझ्या समवेत असतात. तेच माझी काळजी घेतात. एका डब्यातून दुसर्या डब्यात जातांना कुणीतरी मला साहाय्य करायचे अन् माझा हात धरून मला दुसर्या डब्यात पोचवायचे. श्री गुरूंविना माझा हात धरून मला कोण नेणार ?’’ यातून प.पू. फडकेआजींची श्री गुरूंवरील अपार श्रद्धा आणि सेवेची तळमळ दिसून येते.
४ इ. अंथरुणाला खिळलेल्या असूनही आश्रमातील साधकांकडे सतर्कतेने लक्ष असणे : वर्ष २००१ मध्ये प.पू. फडकेआजी देवद (पनवेल) आश्रमाजवळील सनातन संकुलात रहायला आल्या. नंतर ११.७.२००३ ते २०.२.२००७ ही साडेतीन वर्षे त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्या आश्रमात जाऊ शकत नव्हत्या; पण त्यांचे घर आश्रमाच्या शेजारीच असल्याने आश्रमातील उद्घोषणेची यंत्रणा त्यांच्या घरीही जोडण्यात आली होती. त्यामुळे आश्रमात होणारी आरती, तसेच साधकांना संपर्कासाठी केल्या जाणार्या उद्घोषणा त्यांना घरात ऐकू येत असत. काही वेळा एखाद्या साधकासाठी अनेकदा उद्घोषणा केली जायची; परंतु त्याच्याकडून संपर्क केला जात नसे. तेव्हा प.पू. फडकेआजी म्हणायच्या, ‘‘इतक्या वेळा उद्घोषणा करूनही तो साधक संपर्क का करत नाही ? त्याच्या लक्षात येत नसेल, तर अन्य साधक त्याला सांगत नाहीत का ?’’ यातून प.पू. फडकेआजींची सतर्कता दिसून येते. खरेतर ‘संबंधित साधकाने संपर्क का केला नाही ?’, याकडे लक्ष देण्याची त्यांना काहीच आवश्यकता नव्हती; पण आश्रमातील साधकांकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.’
(क्रमश : )
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) (प.पू. फडकेआजी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.२.२०२४)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/774310.html