कै. राघवेंद्र माणगावकर यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘३.३.२०२४ या दिवशी पहाटे ४.३० वाजता मूळ कर्नाटकातील आणि सध्या नागेशी, गोवा येथे रहाणारे सनातनचे साधक राघवेंद्र माणगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे श्री गुरुकृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. माणगावकर यांच्या मृत्यूविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. श्री. माणगावकर साधना करत असल्यामुळे त्यांनी आध्यात्मिक त्रासावर मात करून सात्त्विक काळात स्थूलदेह सोडणे : श्री. माणगावकर यांना २ मार्चच्या रात्री अंदाजे १२ वाजल्यापासून श्वास घेण्यास त्रास होत होता; म्हणून त्यांना आधी फोंडा, गोवा येथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर बांबोळी, गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते. बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पहाटे ४.३० च्या सुमारास, म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर प्राण सोडला.
१ आ. श्री. माणगावकर यांचा अकाली मृत्यू घडवण्यासाठी वाईट शक्तींनी त्यांच्यावर आक्रमणे करणे : व्यक्तीचा प्रारब्धानुसार मृत्यू झाल्यावर त्याला कर्मानुसार पुढच्या लोकात गती मिळते. अयोग्य क्रियमाण, वाईट शक्तींचे आक्रमण इत्यादी कारणांमुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास वाईट शक्ती त्यांच्या लिंगदेहावर नियंत्रण मिळवू शकतात किंवा त्याला पुढची गती मिळण्यामध्ये अडथळे निर्माण करतात. माणगावकर यांच्या संदर्भात असेच करण्यासाठी वाईट शक्तींनी रात्रीपासून त्यांच्यावर आक्रमणे करणे चालू केले होते. त्यामुळे ‘माणगावकर कधीही प्राण सोडतील’, असे मला वाटत होते. असे असले, तरी माणगावकर यांच्या साधनेमुळे ईश्वरी शक्ती त्यांचे रक्षण करत होती. त्यांचे प्रारब्ध भोगण्याचे प्रमाण १०० टक्के झाल्यावर, म्हणजे योग्य वेळीच श्री. माणगावकर यांनी प्राण सोडले. पुढील सारणीतून हे सूत्र अधिक स्पष्ट होईल.
१ इ. श्री. माणगावकर यांची भक्ती आणि गुरुकृपा यांमुळे ईश्वरी शक्तीने त्यांचे रक्षण करणे
टीप – अनुमाने रात्री ३ वाजता संतांनी श्री. माणगावकर यांच्या कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
१ ई. वरील सारणीच्या अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात येणे
१ ई १. श्री. माणगावकर यांचे ईश्वरी शक्तीने रक्षण करणे : रात्री २.३० पर्यंत श्री. माणगावकर यांना प्रारब्धामुळे होणारे त्रास अल्प होते आणि वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणांमुळे होणार्या त्रासाचे प्रमाण अधिक होते. मृत्यूसमयी माणगावकर यांची साधना होऊ न देता त्यांना यातना आणि वेदना देण्यासाठी वाईट शक्ती पहिल्यापासून त्यांच्यावर आक्रमण करत होत्या; मात्र त्यांची साधना असल्यामुळे ईश्वरी शक्ती त्यांचे रक्षण करत होती.
१ ई २. संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे माणगावकर यांना होणारे वाईट शक्तींचे त्रास न्यून होत जाऊन शेवटी ते पूर्णपणे थांबणे : रात्री ३ नंतर संतांनी श्री. माणगावकर यांच्या कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन केल्यानंतर वाईट शक्तींचे त्रास अर्ध्याहून अधिक प्रमाणात न्यून झाले आणि नंतर ते न्यून होत पूर्णपणे थांबले. त्याच वेळी पूर्वीच्या तुलनेत प्रारब्धाच्या प्रमाणात वाढ होत होती; मात्र गुरुकृपा असल्यामुळे माणगावकर यांना मंद आणि मध्यम प्रारब्धाचे भोग भोगावे लागले नाहीत. त्यामुळे त्यांना पुष्कळ अल्प वेदना भोगाव्या लागल्या.
१ ई ३. भक्ती आणि गुरुकृपा यांचे जाणवलेले महत्त्व : पहाटे ३.३० नंतर ब्राह्ममुहूर्त चालू होतो. या वेळी वातावरणात सात्त्विकता अधिक असते. गुरुकृपेमुळे माणगावकर यांनी त्याचे तीव्र प्रारब्ध भोगून संपवले आणि शुभ काळात (ब्राह्ममुहूर्त आणि श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन या दिवशी) स्थूल शरिराचा त्याग केला. यांतून गुरूंप्रती असलेली भक्ती आणि गुरुकृपा यांचे महत्त्व लक्षात येते.
२. देवाशी असलेले अनुसंधान आणि गुरुकृपा यांमुळे माणगावकर यांचा प्राण अनाहतचक्रातून जाणे
मृत्यूसमयी माणगावकर देवाच्या अनुसंधानात होते आणि त्यांच्यावर गुरुकृपाही असल्यामुळे त्यांचे प्राण अनाहतचक्रातून सहजतेने बाहेर पडले. श्री. माणगावकर अनुसंधानात असल्यामुळे त्यांचे प्राण देहातून बाहेर पडत असतांना तिथे सनातनच्या तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) सूक्ष्म अस्तित्व जाणवले.
३. राघवेंद्र माणगावकर मृत्यूसमयी मनाने आंतरिक अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्या पार्थिवाच्या चेहर्यावर पिवळसर छटा आणि निर्विकार भाव असणे
माणगावकर यांच्या पार्थिवाच्या चेहर्यावर पिवळसर रंगाची छटा दिसत होती आणि त्यांचा चेहरा निर्विकार स्थितीत होता. प्रत्यक्षात व्यक्तीचा स्थूल आणि सूक्ष्म देह यांवर मृत्यूपूर्वी मृत्यूचे आवरण निर्माण होते. त्यामुळे मृत्यूपूर्वी मनाची कार्यरतता वाढते. मृत्यूसमयी बहुतेक सर्व जिवांचे मन कार्यरत असल्याने त्यांना अधिक प्रमाणात वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या चेहर्यावरही त्यांना होत असलेल्या त्रासाच्या भावना सहजतेने दिसतात. याउलट माणगावकर यांच्या मनावर असलेल्या साधना आणि भक्ती यांच्या संस्कारांमुळे मृत्यूसमयी त्यांचे मन देवाच्या अनुसंधानात राहिल्याने ते अकार्यरत झाले होते. त्यामुळे त्यांना अन्य जिवांच्या तुलनेत अल्प प्रमाणात वेदना झाल्या.
पुढील सारणीत हे सूत्र अधिक स्पष्ट केले आहे.
४. माणगावकर यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली वैशिष्ट्ये
४ अ. माणगावकर यांच्या शरिराला रुग्णालयाकडून उपचारांसाठी लावण्यात आलेला ‘आय.व्ही. कॅन्युला’ काढल्यावर त्यांच्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे : रुग्णालयातून माणगावकर यांचे पार्थिव त्यांच्या नागेशी येथील निवासस्थानी आणल्यावर त्यांच्या पार्थिवाकडे बघून चांगले वाटत होते; पण त्यावर काही प्रमाणात त्रासदायक शक्तीचे आवरण होते. मृत्यूत्तर विधींसाठी पार्थिवाची सिद्धता करतांना त्यांच्या शरिराला रुग्णालयाकडून उपचारांसाठी लावण्यात आलेला ‘आय.व्ही. कॅन्युुला’(सलाईनसाठी शिरेत लावण्यात येणारे उपकरण) काढला. तो काढताच त्यांच्या पार्थिवावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नाहीसे झाले.
४ आ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावल्यावर वातावरणातील दाब पूर्णपणे नष्ट होणे : माणगावकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानातून सनातनच्या आश्रमाकडे नेतांना मार्गावर दाब जाणवत होता; पण भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवल्यावर दाब पूर्ण नाहीसा झाला. तेव्हा आध्यात्मिक स्तरावरील नामजपादी उपायांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
४ इ. पार्थिवाच्या भोवती संरक्षककवच असल्यामुळे पार्थिवाच्या जवळील २ – ३ मीटरच्या भागात हलकेपणा जाणवणे : मृत्यूत्तर विधीसाठी सिद्धता चालू असतांना वातावरणात दाब जाणवत होता; पण पार्थिवाच्या भोवती २ – ३ मीटरपर्यंत हलकेपणा जाणवून चांगले वाटत होते. विशेषकरून डोक्याकडील भागाकडे अधिक चांगली स्पंदने जाणवत होती. माणगावकर यांच्या साधनेमुळे त्यांच्याभोवती संरक्षककवच असल्याने वातावरणातील दाबाचा परिणाम पार्थिवावर अधिक प्रमाणात होत नव्हता.
५. माणगावकर यांच्या त्यागपूर्ण साधनेमुळे त्यांच्या लिंगदेहाला संरक्षककवच आणि गुरुकृपेमुळे दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने सहजतेने महर्लोकाकडे वाटचाल करणे
पार्थिवावर अग्निसंस्कार पूर्ण झाल्यानंतर माणगावकर यांचा लिंगदेह पिवळ्या रंगाचा होऊन पुष्कळ गतीने उच्चलोकांकडे गतीमान झाला. माणगावकर यांचा लिंगदेह स्वर्गलोक ओलांडून महर्लोकात स्थित झाला.
साधनेसाठी माणगावकर यांनी पुष्कळ त्याग केलेला असल्याने त्यांच्या त्यागपूर्ण साधनेमुळे त्यांच्या लिंगदेहाभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच निर्माण झाले होते. यामुळे वैतरणा नदी, मर्त्यलोक, भुवर्लोक इत्यादी त्रासदायक लोकांतील जीव किंवा तेथील वातावरण यांचा त्यांचावर परिणाम झाला नाही. साधनेसाठी तन, मन, धन यांचा त्याग करण्यासहित त्यांनी गुरूंवर अढळ निष्ठा ठेवल्यामुळे ते गुरुकृपेस प्राप्त झाले. त्यामुळे गुरुकृपेने त्यांच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त होऊन तो स्वर्गलोकाच्याही पलीकडील महर्लोकात स्थिर झाला. त्यामुळे यापुढे त्यांच्या लिंगदेहाला साधना करून अत्यंत अल्प कालावधीत जनलोकाकडे वाटचाल करणे अत्यंत सोपे होणार आहे. यातून साधनेत भक्ती आणि गुरुकृपा यांचे महत्त्व लक्षात येते.
६. ‘साधनेच्या प्रयत्नांना परिस्थिती आणि काळ यांचे बंधन नाही’, हे शिकता येणे
‘सत्’मध्ये रहाण्यासाठी केलेले निरंतर प्रयत्न म्हणजे साधना. चांगल्या आणि वाईट अशा सर्व स्थितीत साधनेचे प्रयत्न केल्यावर ईश्वराची कृपा मिळून त्या परिस्थितीला सामोरे जाणे सहज शक्य होते. ‘साधनेच्या प्रयत्नांना परिस्थिती आणि काळ यांचे बंधन नाही’, हेच कै. माणगावकर यांच्या उदाहरणातून ईश्वराने शिकवलेे.
७. कृतज्ञता : साधकांच्या मनावर साधनेचे संस्कार करून त्यांना स्वयंपूर्ण करणार्या, त्यांचा उद्धार करणार्या आणि मृत्यूनंतरही त्यांची काळजी घेणार्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी नमन ! ‘असे दिव्य गुरु आम्हाला लाभले’, यासाठी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.
|