परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावविश्वात नेणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) राघवेंद्र माणगावकर यांचा साधकांना मिळालेला शेवटचा सत्संग !
१. गुरूंचे त्वरित आज्ञापालन करण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे माणगावकरकाका !
‘३.३.२०२४ या दिवशी राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांचे निधन झाले. १.३.२०२४ या दिवशी ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आमच्या समवेत भोजनकक्षात महाप्रसाद घेण्यासाठी बसले होते. तेव्हा आमचे साधनेच्या संदर्भात बोलणे चालू असतांना ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘मला एक अनुभूती सांगायची आहे.’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘वर्ष १९९८ मध्ये माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांची ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे जाहीर सभा होती. सभा झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या समवेत दौर्यावर येण्याविषयी विचारले. त्या वेळी लगेच मी आणि एक साधक त्यांच्या समवेत जाण्यासाठी तयार झालोे. आम्ही अंगावरील नेसत्या वस्त्रांनिशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत गेलो. त्यानंतर कणकवली येथे गेल्यानंतर आम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी केले. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत ५ दिवस दौर्यावर होतो. या प्रसंगी परात्पर गुरु डॉक्टरांनी आमचे पुष्कळ कौतुक केले.’’ हे सांगत असतांना काकांचा भाव दाटून येऊन त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागले.
त्या वेळी मला (सुश्री (कु.) दीपाली होनप यांना) आठवण झाली की, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ या ध्वनीफितीत मी हा प्रसंग ऐकला आहे. ‘साधकाने गुरूंचे त्वरित आज्ञापालन कसे करायला हवे ?’, या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांनी हे उदाहरण दिले आहे.’ तेव्हा याविषयी मी काकांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हो. मी आणि आणखी एक साधक यांच्या संदर्भातील ते उदाहरण आहे.’’ हे सांगतांना काकांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वहात होता. ‘गुरूंनी माझ्याकडून आज्ञापालन करून घेतले’, याविषयीचा त्यांचा आनंद होता.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव
त्यानंतर काका म्हणाले, ‘‘जाहीर सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर पहिल्या चारचाकी गाडीने पुढे जात होते आणि नंतरच्या गाडीने आम्ही दोघे (माणगावकरकाका आणि काकू) प्रवास करत होतो. तेव्हा ‘आमची गाडी येत आहे ना ?’, हे पहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर मार्गात थांबत असत. परम पूज्य आपल्यासाठी किती करतात ना !’’ हे बोलतांना त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होऊन ते ओक्साबोक्शी रडू लागले.
त्या वेळी त्यांचा गुरूंप्रतीचा भाव पाहून आम्ही स्तब्ध झालो. आमचीही भावजागृती होऊन आमच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या साधकाचा तो शेवटचा सत्संग आमच्यासाठी अविस्मरणीय होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला दिलेली ती अमूल्य भेट होती.
काकांचा भावविभोर करणारा सत्संग दिल्याबद्दल आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘आमच्यातही काकांप्रमाणे भाव निर्माण होऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा आणि सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |