Plastic Bottle Side Effects : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे हृदयासाठी धोकादायक ! – संशोधन

नवी देहली – सध्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. शाळकरी मुलांपासून कार्यालयात जाणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांमध्ये याचे प्रमाण प्रचंड आहे. असे असले, तरी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे मानवी हृदयासाठी धोकादायक ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. इटलीच्या कॅम्पानिया विद्यापिठाच्या एका नवीन अभ्यासातून हे समोर आले आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात सांगण्यात आले आहे की, व्यक्तींच्या धमन्यांमध्ये ‘मायक्रोप्लास्टिक्स’ (प्लास्टिकमधील सूक्ष्म कण) आढळून आले आहे. अलीकडील अभ्यासानुसार एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत सात प्रकारच्या प्लास्टिकचे सरासरी २ लाख ४० सहस्र कण असतात.

हृदयविकाराच्या झटक्याचा धोका साडेचार पटींनी वाढतो !

या संशोधनात सांगण्यात आले आहे की, ‘क्लिंग फिल्म’मध्ये (प्लास्टिकचा एक प्रकार) गुंडाळलेल्या भाज्या अथवा ऑनलाइन मागवलेले मासे हेसुद्धा मानवी हृदयासाठी हानीकारक आहेत. या गोष्टींमधील ‘मायक्रोप्लास्टिक्स’ व्यक्तीच्या रक्तप्रवाहात तरंगते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका साडेचार पटींनी वाढू शकतो.

३ वर्षांत येऊ शकतो हृदयविकाराचा झटका !

या संशोधनाच्या अंतर्गत ३०४ रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक्स आढळले. हे मायक्रोप्लास्टिक्स व्यक्तीच्या ‘कॅरोटीड धमन्यां’मध्ये (मानेत असणार्‍या एका महत्त्वाच्या रक्तवाहिनीमध्ये) आणि मुख्य रक्तवाहिन्यांत जमा होते. यातून मान, चेहरा आणि मेंदू यांना रक्तपुरवठा होतो. इतकेच नाही, तर या मायक्रोप्लास्टिक्समुळे तीन वर्षांत ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे आहेत संशोधनातील निष्कर्ष !

१. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी मायक्रोप्लास्टिक हे अतिरिक्त धोकादायक घटक !

२. रोगप्रतिकारक शक्तीवर आक्रमण !

३. दीर्घकाळ जळजळ चालू होते. त्यामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना हानी पोचते. यामुळे डोळ्यांतून पाणी येणे, हृदयात ‘ब्लॉकेज’ निर्माण होणे आदी होऊ शकते.

‘मायक्रोप्लास्टिक्स’ला काय आहेत पर्याय ?

१. नैसर्गिकरित्या ‘पॅकेजिंग’ केलेल्या गोष्टी निवडा !

२. विश्‍वासार्ह ‘वॉटर फिल्टर’चा वापर करा !

३. भाजीपाला दुकानात जाऊन विकत घ्या, ऑनलाइन ऑर्डर करू नका !

४. प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा काच, स्टील किंवा अगदी सिलिकॉन यांसारख्या वस्तूंचा वापर करा !

५. प्लास्टिकच्या भांड्यात अन्न ठेवून ते ‘मायक्रोवेव्ह’मध्ये ठेवू नका !