केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील धर्मनिष्ठ अधिवक्ता आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले हिंदु राष्ट्र अधिवेशन यशस्वी !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राजनैतिक दृष्टीने सध्याचा काळ अनुकूल असला, तरी सुरक्षेच्या दृष्टीने काळ प्रतिकूल आहे. हिंदु राष्ट्राची मागणी दिवसागणिक वाढत चाललेली आहे. घटनात्मक व्यवस्थेत बहुमताला प्राधान्य असते आणि त्यानुसार राज्यव्यवस्था बनवण्याचे प्रावधान (तरतूद) असते. भारतीय राज्यघटनेत ‘अनुच्छेद ३६८ ब’ यात हे प्रावधान आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील तारामंडल स्थित राजवाडा सभागृहात धर्मनिष्ठ अधिवक्ता आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते मार्गदर्शन करत बोलत होते.
या अधिवेशनामध्ये गोरखपूर ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. सेतबंध रामेश्वर मिश्र, गायत्री शक्तीपिठाचे गोरखपूर अध्यक्ष श्री. ज्योती भूषण राय, शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रितेश आल्हा, चित्रगुप्त सभेचे डॉ. अजय राय आदी मान्यवरांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये येणार्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना’, याविषयी उपस्थितांचे उद्बोधन केले. अधिवेशनामध्ये प्रत्येक मासाला एकत्रित येऊन राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात आंदोलन करणे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून नियमित कार्य करणे, भविष्यात मंदिर महासंघाचा प्रारंभ करण्यासाठी मंदिरांचे संघटन करणे आदी उपक्रम ठरवण्यात आले. यासह हलाल अर्थव्यवस्था, लव्ह जिहाद, तणावमुक्तीसाठी साधना आदी विभिन्न विषयांवर व्याख्याने आयोजित करण्याचे ठरले.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्र
या अधिवेशनाच्या आयोजनात ‘ब्राह्मण विचार मंचा’चे अध्यक्ष अधिवक्ता पंडित शेषनारायण पांडेय, ‘ब्रह्मविद्या संस्थे’चे धर्मनिष्ठ अधिवक्ता लक्ष्मी शंकर शुक्ला, ‘भूसुर वेल्फेअर असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आशुतोष पांडे यांनी पुढाकार घेतला. सभागृह, भोजन व्यवस्था, निमंत्रण आणि प्रत्यक्ष सिद्धता आदी सर्व व्यवस्था त्यांनी केली होती. या तीनही अधिवक्त्यांनी इच्छा व्यक्त केली की, एक दिवसाच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन आम्ही गोरखपूर येथे करू इच्छितो. त्यानुसार त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सिद्धता पुष्कळ चांगल्या प्रकारे केली होती.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे अधिवक्ता पंडित शेषनारायण पांडेय, अधिवक्ता लक्ष्मी शंकर शुक्ला आणि अधिवक्ता आशुतोष पांडे !
अधिवक्ता पंडित शेषनारायण पांडे, अधिवक्ता लक्ष्मी शंकर शुक्ला आणि अधिवक्ता आशुतोष पांडे हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून नियमितपणे प्रांतीय अन् गोवा येथे होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी होतात. राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात निवेदने देणे, अधिवक्त्यांचे संघटन करणे, जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे यांसाठी हे तीनही अधिवक्ते प्रयत्नरत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती या तीनही अधिवक्त्यांच्या मनात पुष्कळ भाव असून त्यांना समितीच्या कार्याप्रती आदर वाटतो. ते स्वतःहून अन्य अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना ‘गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जाऊन सात्त्विकता अनुभवायला जा’, असे आग्रहाने सांगतात.