संपादकीय : तमिळनाडूला ‘विजय’ नको !

तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (‘सीएए’) लागू करू नये, असे मत दाक्षिणात्य अभिनेते विजय थलपती यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी विजय यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम्’ या पक्षाची स्थापना केली आहे. ‘सर्व समान आहेत’, हे या पक्षाचे ब्रीदवाक्य आहे. ‘हा पक्ष लोकसभेची निवडणूक लढवणार नाही; मात्र वर्ष २०२६ मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक लढवेल’, असे विजय यांनी घोषित केले आहे. राज्यात स्वतःचे बस्तान बसवायचे, तर राजकीय, राष्ट्रीय किंवा राज्य स्तरीय विषयांवर मत मांडणे, हे ओघाने आलेच. त्यामुळे विजय यांनी हे मत मांडले आहे आणि यापुढेही ते त्यांची विविध विषयांवर मते मांडत रहातील. ‘त्यांची किंवा त्यांच्या पक्षाची मानसिकता काय असेल ?’, ‘त्यांचा पक्ष समाजातील नेमक्या कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित करील आणि पक्षाची पुढील धोरणे काय असतील ?’, हे ओघाने कळेलच ! असे असले, तरी अन्य पक्षांप्रमाणे विजय, जे स्वतः ख्रिस्ती आहेत, तेही ‘अल्पसंख्यांकांचे तळवे चाटून त्यांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’, असे त्यांच्या वक्तव्यावरून तरी दिसून येते. ‘सीएए’विषयी त्यांनी मत व्यक्त केल्यावर ‘या कायद्याविषयी विजय यांना किती ज्ञान आहे ?’, अशी विचारणा होऊ लागली. विजय या कायद्याला नेमका कोणत्या सूत्रावरून विरोध करत आहेत, हे समजण्यास वाव नाही; मात्र ‘या कायद्यामुळे भेदभाव निर्माण होईल’, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानावरून विजय आणि त्यांचा पक्ष तमिळनाडूत काय प्रकाश पाडणार ? हे सूज्ञ नागरिकांना कळले असेलच !

अभिनेते बनले राजकारणी !

‘सामाजिक कार्य करणारे अभिनेते’ म्हणून विजय यांची राज्यात ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये ‘गरिबांचा तारणहार’, ‘अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा’, ‘अत्याचार करणार्‍या गुंडांना धडा शिकवणारा पोलीस अधिकारी’ अशा आशयाच्या भूमिका रंगवल्या आहेत. त्यामुळे राज्यात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची ही प्रतिमा त्यांना राजकारणात जम बसवायला पुरेशी आहे का ? हे पहावे लागेल. मध्यंतरी त्यांचा ‘मर्सेल’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केंद्र सरकारने राबवलेल्या ‘जी.एस्.टी.’ आदी योजनांवर टीका करणारी वाक्ये विजय यांनी रेखाटलेल्या पात्राच्या तोंडी होती. त्यामुळे ‘विजय भाजपविरोधी आहेत’, असे सांगत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

तमिळनाडूमध्ये अभिनेता राजकारणी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. एम्.जी. रामचंद्रन्, जयललिता, विजयकांत, कमल हासन, उदयनिधी स्टॅलिन अशा अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात राजकारणात प्रवेश केला. यांतील रामचंद्रन् आणि जयललिता ही तमिळी राजकारणातील मोठी नावे ! त्यांनी जसा अभिनयाचा ठसा उमटवला, तसे राजकारणातही मोठी कामगिरी बजावली. जयललिता यांनी मुख्यमंत्रीपद भूषवून तमिळी राजकारणात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले. विजयकांत किंवा कमल हासन यांनी राजकारणात विशेष कामगिरी बजावली नाही. असे असले, तरी कमल हासन सातत्याने राष्ट्रघातकी विचार मांडत असतात. त्यांनी ‘मक्कल नीधी मैयम’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षाला लोकांनी झिडकारले. उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनयात जम बसवता आला नाही. वडील एम्.के. स्टॅलिन यांच्या पुण्याईवर ते राजकारणात उतरले आणि मंत्रीही झाले. यापेक्षा त्यांचे कार्यकर्तृत्व शून्य ! ना त्यांना जनतेच्या समस्यांची चिंता, ना वास्तवाचे भान ! ‘तमिळनाडूच्या राजकारणात टिकून रहायचे, तर हिंदु धर्मावर चिखलफेक करायलाच हवी’, ही त्यांना त्यांचे आजोबा एम्.के. करुणानिधी आणि वडील स्टॅलिन यांच्याकडून मिळालेली शिकवण ! या शिकवणीनुसार त्यांचा राजकीय प्रवास चालू आहे. ‘विजय आणि त्यांचा पक्ष यांना तमिळी लोक किती आपलेसे करतील ?’, हाही मोठा प्रश्नच आहे. त्यासाठी लोकांना थोडी वाट पहावी लागेल.

‘अभिनेता राजकारणी होऊ शकत नाही’, असे म्हणण्याचे काही कारण नाही. लोकांचे मनोरंजन करणार्‍या एखाद्या अभिनेत्यामध्ये नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक कार्य करण्याची इच्छा असेल, तर तो चांगला राजकारणीही होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे भारतीय राजकारणात उपलब्ध आहेत. प्रश्न हा आहे की, विजय हे आव्हान पेलू शकतील का ? तमिळनाडूमधील समाज व्यक्तीनिष्ठ आहे. तेथे अभिनेत्यांना ‘देव’ म्हणून पुजले जाते. त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या पूर्वी अभिनेत्यांचे मोठे फलक लावून त्यांची पूजा करणे, त्यांना दुधाचा अभिषेक करणे असले हास्यास्पद प्रकार तेथे घडतात. त्यामुळे असे अभिनेते जेव्हा राजकारणात येतात, तेव्हा लोकांना त्यांचे प्रेम मिळते; मात्र ‘त्याची परतफेड ही जनतेची कामे करून, त्यांच्या समस्या सोडवून करायची असते’, हे या अभिनेत्यांना कळत नाही. त्यामुळे राजकारणातील त्यांचा प्रवास बिकट होतो.

तमिळींची मानसिकता पालटेल !

तमिळनाडूचे राजकारण हे ‘आर्य विरुद्ध द्रविड’, ‘हिंदी आणि हिंदु विरोधी’ या सूत्रांभोवती फिरते. याला भाजप अपवाद आहे, असे म्हणता येईल; मात्र द्रविडी मानसिकता जोपासता न आल्याने या पक्षालाही मागील काही वर्षांत राज्यात भरीव कामगिरी करता आलेली नाही. ‘तेथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूच्या राजकारणात मोठे पालट होतील का ?’, हे पहावे लागेल. मागील काही वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला, तर या राज्यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष आलटून-पालटून सत्तेवर येतात. ‘या दोन्ही पक्षांनी तमिळनाडूचा विकास किती केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे कमल हासन काय किंवा विजय काय, यांच्या पक्षांचा तमिळी जनतेला काय उपयोग होणार ? तमिळनाडूमध्ये राजकीय पक्षांची कमतरता नाही; मात्र तेथील बहुतांश पक्षांचे विखारी विचार हे जनतेला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत. हे अधःपतन थांबवण्यासाठी तेथील जनतेमध्ये राष्ट्रीय आणि धार्मिक अस्मिता रुजवण्याचे मोठे दायित्व कुणी तरी पार पाडावे लागेल. जनतेमध्ये निर्माण झालेल्या राष्ट्रघातकी मानसिकतेमुळे तमिळनाडूची नाळ देशापासून तुटली आहे. ही नाळ पुन्हा जोडणार्‍या पक्षाची तेथील जनतेला आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचे दायित्व वाढणार आहे. ‘सीएए’सारख्या राष्ट्रहित जोपासणार्‍या कायद्यांना विरोध करणारे विजय यांची तमिळनाडूला आवश्यकता नाही’, असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत विजय यांच्यासारखे राजकारणी आणि त्यांचे पक्ष यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आता जनतेने पुढाकार घ्यायला हवा.

निवडणुकीत राष्ट्रविघातक मानसिकता जोपासणार्‍या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा !