बंगालमधील प्राणी संग्रहालयातील अधिकार्‍यांचा हिंदुद्वेष !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. बंगालमधील प्राणीसंग्रहालयामध्ये सिंह-सिंहिणीला ‘अकबर’ आणि ‘सीता’ अशी नावे दिल्याच्या विरोधात ‘विश्व हिंदु परिषदे’ची कोलकाता उच्च न्यायालयात याचिका !

बंगालच्या सिलीगुडी येथील सफारी प्राणी संग्रहालयामधील सिंह आणि सिंहीण यांची अनुक्रमे ‘अकबर’ अन् ‘सीता’ अशी नावे असल्याचे लक्षात आले. ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवल्यामुळे देशभर तणाव निर्माण झाला. विश्व हिंदु परिषदेने या नावांवर आक्षेप घेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपायगुडी खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. त्यात त्यांनी ‘सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ का ठेवले ?’, असा प्रश्न विचारला. सीता ही प्रभु श्रीरामाची पत्नी असून पंचकन्यांतील एक देवीस्वरूप व्यक्तीमत्त्व आहे. जाणीवपूर्वक सिंहिणीचे नाव ‘सीता’ आणि सिंहाचे नाव ‘अकबर’ ठेवण्यात आले. ‘यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने ही नावे त्वरित पालटण्यात यावीत’, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ अधिवक्ता सुदीप मजुमदार यांनी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने युक्तीवाद केला.

२. सिंह आणि सिंहीण यांची नावे पालटण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

हे प्रकरण न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांच्यासमोर आले. त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयातील अतिरिक्त महाधिवक्ता जॉयजित चौधरी यांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार किंवा प्राणी संग्रहालय यांनी सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवले नसते, तर प्रश्नच नव्हता; परंतु असे नाव ठेवल्याने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे ही नावे त्वरित पालटण्यात यावीत.

यावर प्राणी संग्रहालयाच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, या सिंहांना ‘त्रिपुरा सेपाहिजला’ प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले होते. ही नावे बंगालच्या प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलेली नाहीत. विहिंपचे अधिवक्ता म्हणाले की, सिंहिणीला सीतामातेचे नाव दिल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सीतेला देवळात राहू द्या; पण जंगलात नको. सिंह जरी दुर्गामातेच्या चरणांशी असला, तरी त्याचा कुठेही मंत्रात उल्लेख केलेला नाही. ‘याला जनहित याचिका म्हणायचे कि रिट याचिका ?’ हा प्रश्न विचाराधीन आहे’, असे न्यायालयाने म्हटले. ‘सदर नावे कुणी ठेवली ?’, ही माहिती घेऊन न्यायालयात सादर करतो’, असे प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.

३. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी उत्तरदायींना कारागृहात पाठवा !

एकंदरच हिंदूंनी प्रविष्ट केलेली याचिका रास्त आहे. प्राणी संग्रहालयातील साम्यवादी कर्मचारी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे प्राण्यांची नावे ठेवण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील संबंधित कर्मचार्‍यांना त्रिपुरा सरकारने निलंबित केले आहे. असे असले, तरी त्या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदवून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याविषयी त्यांना कारागृहात पाठवायला पाहिजे. उच्च न्यायालय हिंदु धर्मियांच्या भावनांची कदर करील, ही शाश्वती आहे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२६.२.२०२४)