Canada Khalistan Protest : कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खलिस्तान्यांनी आणले होते तलवारी आणि भाले !

कॅनडा पोलिसांनी खलिस्तान्यांना कार्यक्रमस्थळावरून हाकलले !

ओटावा (कॅनडा) – खलिस्तान समर्थक आंदोलकांनी कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तलवारी आणि भाले घेऊन आले होते. या वेळी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडण्यापूर्वीच कॅनडाच्या पोलिसांनी त्यांना तेथून हाकलून लावले. वर्मा ११ मार्चला ‘इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एडमंटन येथे आले होते, तेव्हा ही घटना घडली. या वेळी खलिस्तान समर्थकांनी वर्मा यांच्या विरोधात अपमानास्पद घोषणाबाजीही केली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कॅनडाचे पोलीस कर्मचारी शस्त्रे घेऊन पुढे जात असलेल्या खलिस्तान समर्थकांना मागे ढकलत असल्याचे दिसत आहे. भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी ‘द हिंदु’ वृत्तपत्राला सांगितले की, खलिस्तान समर्थकांनी कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला; परंतु ते यशस्वी झाले नाहीत.

१. ११ मार्चच्ला घडलेल्या या घटनेच्या वेळी खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्त आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी एका खलिस्तान्याने भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमानही केला. खलिस्तान्यांनी कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला.

२. खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या समर्थकांनी ११ मार्चला होणार्‍या कार्यक्रमाला विरोध करण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके प्रसिद्ध केली होती. यानंतर कॅनडाच्या अधिकार्‍यांनी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने सुरक्षादल तैनात केले. त्यांनीच आक्रमणाच्या प्रयत्नाच्या वेळी भारतीय उच्चायुक्त आणि त्यांच्या पत्नी यांना कार्यक्रमात सुरक्षितपणे बाहेर नेले.

३. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये काम करणारे अधिकारी काही काळापासून खलिस्तान्यांचे लक्ष्य आहेत. हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी आतंकवाद्याच्या हत्येनंतर खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिहग पन्नू याने भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून भारतीय अधिकार्‍यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?