दूरगामी दुष्परिणाम दर्शवणार्‍या प्रतिदिनच्या काही सवयी

१. पोट साफ व्हायच्या आधी दात घासणे 

मल बाहेर टाकण्यासाठी अपान क्षेत्रातील खालील दिशेची गती आवश्यक. आधी मल विसर्जन करून नंतर दात घासावेत.

२. जेवणानंतर झोपणे

रात्री जागरण झाले असल्यास जेवणाआधी, तेही जागरण झाले त्याच्या अर्धा वेळ झोपावे. पुष्कळ झोप आल्यास बसून झोपावे, म्हणजे अंगात जडपणा येत नाही.

३. सकाळी गरम पाणी आणि मध पिणे

मध हा कायम सामान्य तापमानाच्या पाण्यातून तो ही सल्ला घेऊन प्यावा. गरम पाण्यातून मध घेतला असता मध हा अत्यंत गुरु (जडपणा) आणि पचायला विष समान होतो.

४. रात्री नियमित दही किंवा दहीभात खाणे

रात्री दही पूर्णतः वर्ज्य. रात्री नियमित दही खाल्ल्यास दूरगामी आम्लपित्त, कफाचे विकार, त्वचा विकार, पित्ताचे विकार यांना कारणीभूत ठरते.

५. सकाळी मध, लिंबूपाणी घेणे

लिंबू ‘अल्कालाईन’ असते; पण ते पुष्कळ दिवस घेतले असता त्याच्या ‘अल्कधर्मीय’ रस अधिक्याने केस गळणे, केस पांढरे होणे, त्वचा विकार, जुनाट सर्दी हे विकार झालेले दिसतात.

६. प्रतिदिन ताकात मीठ घालून पिणे

ताकात सैंधव घालून प्यावे. प्रतिदिन अधिकच्या मीठाने केस पांढरे होणे, अंगात उष्णता वाढणे, खाज येणे, दाह होणे ही लक्षणे दिसतात.

वैद्या स्वराली शेंड्ये

७. पुष्कळ वेळ खसखसून दात घासणे

‘टूथपेस्ट’ने पुष्कळ वेळ आणि पुष्कळ वेळा दात घासण्याने त्याच्या वरचा स्तर निघून जातो आणि दात ‘सेन्सिटिव्ह’ (संवेदनशील) होणे, लवकर झिजणे, खायला त्रास होणे, लवकर पडणे हे त्रास होतात.

 

८. शरीर क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम प्रतिदिन करणे 

सांधेदुखी, स्नायूदुखी, पित्ताचे त्रास, तापाची पूर्व लक्षणे दिसतात.

९. तहान नसतांना पाणी पिणे आणि भूक नसतांना खाणे

पाण्याची एक मात्रा आणि खाण्याचा एक प्रकार सगळ्यांना लागू होत नाही. प्रकृती, वय, शारीरिक हालचाल, आजार, अग्नी यांवर याचे प्रमाण पालटते. अग्नी मंद होणे, पोट डब्ब होणे ही लक्षणे दिसतात.

१०. कच्च्या भाज्या आणि मोडाची कडधान्ये खाणे हे कोरडेपणा आणून वात वाढवतात.

वरील सामान्यतः केल्या जाणार्‍या सवयी स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी टाळाव्यात.

– वैद्या स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.