श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास संमती !
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने संमती दिली आहे. महापालिकेचा आराखडा आणि प्राधिकरणाच्या अंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे, तसेच त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही संमती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय ‘श्री महालक्ष्मीदेवी परिसर पुनर्विकास आराखडा समिती’ची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये श्री महालक्ष्मीदेवी परिसर पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. सादर केलेला आराखडा बैठकीमध्ये संमत करण्यात आला.
महापालिकेने श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकासासाठी बनवलेल्या २५५ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या अंतर्गत ४५ कोटी रुपयांच्या निधीला संमती मिळाली आहे. त्या आराखड्यात आणि नव्याने बनवण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर विकास प्राधिकरण अंतर्गत आराखड्यात दर्शन मंडप, वाहनतळ यांसारखी काही कामे आली आहेत. या दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले आहेत.