राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये प्रतिनिधी नियुक्त केला जाणार !
धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयात विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाची निर्मिती !
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – विशेष सवलती देऊनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी शासनाकडून घोषित करण्यात येणार्या योजनांचा लाभ धर्मादाय रुग्णालयांकडून दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विधी आणि न्याय विभागाकडून हा कक्ष नियंत्रित केला जाणार असून यापुढे राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात विधी आणि न्याय विभागाचे प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती या कक्षाच्या पदाधिकार्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या कक्षाची निमिती करर्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयांतून गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांसाठी प्रत्येकी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम, तसेच रुग्णालयांच्या एकूण महसुलावरील २ टक्के निधीतून रुग्णांवर उपचार करणे आदी नियमांचे पालन होत आहे ना ? याकडे हा कक्ष नियंत्रण ठेवणार आहे. धर्मादाय रुग्णालयात भरती होणार्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची नोंदणी ‘ऑनलाईन’रित्या केली जाणार आहे. या कक्षासाठी मंत्रालयात ३२ कर्मचारी देण्यात आले आहेत, तर धर्मादाय रुग्णालयात नियुक्त करण्यासाठी १५६ कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत राज्यात एकूण ४७६ धर्मादाय रुग्णालये असून या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० सहस्र ४४७ खाटा राखीव आहेत.
२४ शासन आदेश रहित करून विधी आणि न्याय विभागाकडून नियंत्रण !
यापूर्वी धर्मादाय रुग्णालयांतील उपचारांचा आढावा आरोग्य, वैद्यकीय विभाग आणि विधी अन् न्याय विभाग यांकडे विभागून दिला जात होता. विविध विभागांमधून यांचे समन्वय ठेवणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे विधी आणि न्याय विभागाकडून धर्मादाय रुग्णालयांचे नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी २४ शासन आदेश शासनाकडून रहित करून सर्व समन्वयच विधी आणि न्याय विभागाकडून केले जाणार आहेत. लवकरच या कक्षाचे उद्घाटन होऊन राज्यभरात या कक्षाद्वारे आरोग्य साहाय्याचे कार्य चालू केले जाईल, अशी माहिती या कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी दिली. |