अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतील काही रक्कम बँकेच्या अधिकार्यांना दिल्याची कर्जदार वैकर यांची माहिती !
२९१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपव्यवहाराचे प्रकरण
नगर – अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतून २० लाख रुपये बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख रूपात देऊन १० लाख रुपये बँकेचे अधिकारी हेमंत बल्लाळ यांना दिल्याची कबुली ‘एव्हीआय इंजीनियरिंग’ आस्थापनाचे संचालक अविनाश वैकर यांनी पोलीस अन्वेषणात दिली. २९१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडून चालू आहे.
पोलिसांनी कर्जदार वैकर यांना कह्यात घेऊन ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांनी व्यवसायासाठी वेळोवेळी २ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील काही रक्कम दुसर्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवण्यासाठी, काही रक्कम वैयक्तिक खरेदीसाठी आणि काही रक्कम रोख स्वरूपात काढून कर्ज रकमेचा अपहार केला. संमत कर्ज रकमेतून २० लाख रुपये रोख काढून त्यांनी दिलीप गांधी यांना दिले असल्याचे मान्य केले. वैकर यांची कर्ज परतफेड करण्याची क्षमता न पडताळता त्यांचे कर्ज संमत करण्यासाठी बँकेचे अधिकारी हेमंत बल्लाळ यांनी साहाय्य केले. या गुन्ह्याच्या सखोल अन्वेषणासाठी आणखी ५ दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी अधिवक्ता मंगेश दिवाळे यांनी केली. त्यावर न्यायालयाने वैकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
संपादकीय भूमिकाअसा चालतो बँकांचा कारभार ! अपव्यवहार करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |