‘निर्विचार’ नामजप करतांना गोवा येथील रामनाथी आश्रमातील श्री. ओंकार कानडे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
१. ‘निर्विचार’ नामजप केल्यामुळे मन शांत होऊन नकारात्मकता उणावल्यामुळे सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांना गती मिळणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ‘निर्विचार’ नामजप करायला आरंभ केल्यापासून ‘माझ्या मनाची उद्विग्नता न्यून झाली असून माझे मन शांत झाले आहे. प्रसंगांचा मनावर होणारा परीणाम न्यून होऊन मन नकारात्मक होण्याचा कालावधी उणावला आहे. आध्यात्मिक त्रास वाढल्यावर मनाला येणारी अस्थिरता न्यून झाल्याने सेवेत आणि व्यष्टी प्रयत्नांत स्थिरता आली आहे. त्यामुळे नियोजनात सातत्य आले अन् ‘चुकांचा मनावर येणारा ताण न्यून होऊन सेवेची गती वाढली’, असे मला जाणवले.
२. ललिता त्रिपुरसुंदरीदेवी यागाच्या वेळी भाव न जाणवणे, देवीने भावप्रयोगाऐवजी नामजप करायला सांगणे आणि ‘निर्विचार’ नामजप करतांना नामजपात मन एकाग्र होऊन यागाचे भानही अल्प होणे
रामनाथी आश्रमात काही दिवस सलग याग होत होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या यागातील चैतन्याचा लाभ घेण्यासाठी मी नामजप करत असतांना मला भाव जाणवत होता आणि बराच वेळ मला ती भावावस्था अनुभवता आली; पण ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या यागाच्या वेळी मला भाव अनुभवता येत नव्हता. मी देवीला विचारले, ‘मी काय करू ? माझे नामजपादी उपाय नीट होत नाहीत.’ तेव्हा देवी मला म्हणाली, ‘आज भावप्रयोग करू नको, केवळ नामजपच कर’; म्हणून मी ‘निर्विचार’ नामजप करायला आरंभ केला. ‘निर्विचार’ नामजप चालू केल्यावर केवळ १५ मिनिटांतच माझे मन नामजपात एकाग्र झाले आणि ‘याग चालू आहे’, याचे भानही अल्प झाले.
३. ‘निर्विचार’ हा नामजप अंतर्मनात जाऊन अंतर्मनातील संस्कारकेंद्रांभोवती त्याचे कवच निर्माण होणे आणि ‘कवचाच्या आतील अयोग्य संस्कार नष्ट होत आहेत’, असे जाणवणे
‘निर्विचार’ नामजप करतांना देवाने मला दाखवले, ‘निर्विचार’ हा नामजप माझ्या अंतर्मनात जात असून अंतर्मनातील सर्व संस्कारकेंद्रांभोवती गोलाकार आकारात ‘निर्विचार’ या नामजपाचे कवच निर्माण होत आहे. असे कवच निर्माण झाल्यामुळे अंतर्मनातील संस्कारांचे मनात येणारे विचार न्यून होऊन आपोआपच त्या संस्कारांची तीव्रताही न्यून होत आहे. ते संस्कार उफाळून येण्यासारखे प्रसंग घडले, तरी ‘निर्विचार’च्या कवचामुळे ‘ते संस्कार उफाळून येऊ शकणार नाहीत’, असे मला वाटले. ‘निर्विचार’ नामजप नियमित केल्यावर या नामजपाचे कवच आणखी मोठे आणि शक्तीशाली होईल. त्यामुळे या कवचाच्या आतील अयोग्य संस्कार नष्ट होतील’, असे मला वाटले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालदर्शी असल्यामुळे ‘आपत्काळातील विनाश पाहून साधकांना त्रास होऊ नये’, यांसाठी त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ नामजप करायला सांगितला आहे’, असे वाटणे
‘प.पू. गुरुमाऊली त्रिकालदर्शी असल्यानेच त्यांनी आपत्काळासाठी आवश्यक असलेला ‘निर्विचार’ नामजप साधकांना करायला सांगितला’, असे मला वाटले. ‘येणार्या आपत्काळात होणारा विनाश पाहून भावनाशीलता किंवा अन्य स्वभावदोषांमुळे साधकांना होऊ शकणारा मानसिक त्रास न्यूनतम व्हावा’, यासाठी त्यांनी हा नामजप सांगितला असावा. यातून ‘साधकांना त्रास होऊ नये’, याची त्यांनाच किती तळमळ आहे आणि त्यांची साधकांवर किती प्रीती आहे’, याची मला जाणीव झाली. मला अशी अनुभूती दिल्यासाठी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. ओंकार कानडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|