आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी
देवरुख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयात व्याख्यानमाला
देवरुख – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठीचे कसे संवर्धन केले, इंग्रजी शब्दांना सुमारे २०० पेक्षा अधिक मराठी प्रतिशब्दही शोधले आणि त्याविषयी सुंदर विवेचन केले. आज मात्र आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी झालो आहोत. आमच्या मराठी शाळा ओस पडल्या आहेत, अशी खंत गोवा येथील मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयात , संत विचारांचा सामाजिक अन्वयार्थ, माझी मराठी : न वाटा आणि वळणे आणि जी.एं. ची कथा : अक्षरापल्याडचे आकाश या विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी पुढे म्हणाले की,
१. संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.
२. इंग्रजी ही ज्ञानभाषा असली, तरी मराठीला न्यून लेखून चालणार नाही. कारण मराठी मातृभाषिक माणूस मराठीतूनच विचार करतो आणि मग त्याचे भाषांतर इंग्रजीमध्ये करतो. त्यामुळे कोणतीही अन्य भाषा शिकायची असेल, तर मातृभाषा ही उत्तम प्रकारे आली पाहिजे. त्यामुळे मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जी.एं. कुलकर्णी यांच्या साहित्यावर ज्या ज्या संशोधकांनी संशोधन केले. त्या आर्दी, वडेर इत्यादी संशोधकांची आठवण करून, त्यांची मते मांडून जी. एं.च्या कथा वाटतात तेवढ्या गूढ नाहीत, असे प्रतिपादन प्रा. कुलकर्णी यांनी केले.