रत्नागिरीत झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’त मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार !
रत्नागिरी, १२ मार्च (वार्ता.) – रविवार, १० मार्च या दिवशी येथील ‘श्रद्धा साफल्य मल्टीपर्पज’ सभागृहात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनात जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी असे ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. या अधिवेशनात मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार करण्यात आला. या अधिवेशनाच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी ठराव मांडले. ॐ चा उच्चार करून मांडण्यात आलेले ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवण्यात आले.
या अधिवेशनात श्री महालिंग देवस्थान न्यास १५ गाव विभाग धामणंद; शारदादेवी मंदिर, तुरंबव; सावर्डे श्री भवानी वाघजाई मंदिर, देवस्थान, टेरव; श्री विंध्यवासिनी मंदिर, चिपळूण; अखिल गुरव समाज संघटना, रत्नागिरी जिल्हा; श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, रत्नागिरी; श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा आणि संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आदींचे विश्वस्त, पुजारी उपस्थित होते.
उपस्थितांचे मनोगत
श्री. सुनीत भावे, सचिव, श्री सोमेश्वर सुंकाई एंडोव्हमेंट ट्रस्टचे, पिरंदवणे, ता. रत्नागिरी.
आज अधिवेशनात मंदिरांची स्थिती लक्षात आली. या मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांसाठी काहीतरी करू शकतो, असा विश्वास निर्माण झाला. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
श्री. स्वप्निल भिडे, अध्यक्ष, श्री महाकाली मंदिर आडीवरे, ता. राजापूर.
तालुक्यातील महाकाली मंदिरात पुढील अधिवेशन होईल, यासाठी निश्चित प्रयत्न करू. अनेक लहान पण महत्त्वाची सूत्रे तेथील लोकांना समजतील. अधिकाधिक लोकांनी या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे.
अधिवक्ता विवेक रेळेकर, अध्यक्ष, श्री नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ, चिपळूण
इथे कार्यक्रमासाठी जो वेळ गेला त्याचा सदुपयोग झाला, असे वाटले. सनातन धर्म मंदिरांमुळे जिवंत आहे. मंदिराचा विश्वस्त म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेले पुण्यकर्मच आहे.
श्री. सुरेश रेवाळे, उपाध्यक्ष, श्री महालक्ष्मी मंदिर, ब्राह्मणवाडी, जालगाव, ता. दापोली
हिंदु धर्माचा मंदिर हाच पाया आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. अडचण असेल, तिथे एकमेकांना साहाय्य करूया.