अमरावती येथे आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक !
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार !
अमरावती – अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत कमानीला ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती; परंतु याला गावातील इतर समाजबांधवांनी विरोध केला. त्यामुळे गावात २ समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाच्या अनुषंगाने काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. गेल्या ५ दिवसांपासून प्रवेशद्वाराचा वाद चालू आहे. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या, तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवार्याने मारा केला.
प्रवेशद्वार प्रकरणातील वादावर आंबेडकरवाद्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही गटांतील शिष्टमंडळासमवेत बैठक घेऊन प्रवेशद्वारावर २ महापुरुषांचे नाव देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ही सूचना बौद्ध समाजाला मान्य आहे; मात्र असे असतांना पालकमंत्र्यांच्या सूचनेवर जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिले नसल्याने आयुक्त कार्यालयासमोर चालू असलेले ठिय्या आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. ‘जोपर्यंत आम्हाला लिखित पत्र मिळणार नाही, तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही’, अशी चेतावणी आंदोलकांनी दिली.