वेळप्रसंगी १४ गावांतील जनतेला घेऊन जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन ! – राजू यादव
कोल्हापूर – सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम चालू असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उंचगाव या रस्त्यावर खोदाईचे काम चालू असून गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणीयोजनेच्या वाहिनीस गळती लागली आहे. उंचगावसह अनेक गावांना याच योजनेतून पाणीपुरवठा केला जात असून या गावांसाठी अन्य पर्यायी पाण्याची व्यवस्था नाही. तरी पुढील काळात रस्ता खोदाईचे काम करतांना नळपाणी योजनेस धक्का लागणार नाही, अशी काळजी घ्यावी; अन्यथा वेळप्रसंगी १४ गावांतील जनतेला घेऊन जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी प्राधिकरणास दिले आहे. हे निवेदन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रकांत भरडे यांनी स्वीकारले. या प्रसंगी सर्वश्री दीपक रेडेकर, राहुल गिरुले, योगेश लोहार, शरद माळी, उत्तम आडसूळ, संतोष चौगुले, दीपक पोपटाणी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.