अशांना सनातनच्या आश्रमात पाठवू नका !
वर्ष २०२३ मध्ये एक सुप्रसिद्ध गायिका रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. आश्रमात चालणार्या विविध सेवांविषयी आणि त्या-त्या सेवेशी संबंधित माहिती ऐकून न घेता त्या पुढे-पुढे जात होत्या. आश्रमात चालू असलेल्या एका शिबिरातील एका सत्राला त्या बसल्या. त्यात चालू असलेला विषय पूर्ण न ऐकताच त्या मध्येच बाहेर आल्या.
‘सनातन प्रभात’चे कार्यालय पहातांना ‘हिंदु राष्ट्रा’वरून घातला वाद !
आश्रमातील दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय पहातांना त्या गायिकेने तेथे उपस्थित ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादकांशी वाद घातला. या वेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या काहीच ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यांनी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी शंका उपस्थित केल्या, तसेच विखारी टीकाही केली. त्या म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्रासारखे शब्द वापरून तुम्ही लोकांमध्ये भीती निर्माण करत आहात. आपला धर्म पुष्कळ श्रेष्ठ आहे. तुम्ही रावण बनू नका ! असे नकारात्मक विचार करू नका आणि कुणाला भीती दाखवून हिंदु धर्माचे ज्ञान देऊ नका !’’ स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या आणि ‘माझे म्हणणे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा’, अशा प्रकारे अरेरावी करत होत्या. दैनिक कार्यालयात लावलेल्या एका फलकावर ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक !’, असे लिहिले आहे. ते पाहून त्यांनी आक्षेप घेतला. या वेळी त्या म्हणाल्या की, हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे.
त्या वाद घालत असतांना त्यांच्यासह आलेले अन्य एक पाहुणेही त्यांना समजावून सांगू लागले, तरी त्या ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हत्या.
अध्यात्म, साधना किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठीचे कार्य यांची आवड असणार्यांनाच सनातनचा आश्रम बघण्यास पाठवा !‘हल्ली बरेच साधक त्यांच्या परिचितांना ‘तुम्ही त्या गावी जात आहात, तर तेथे आमचा आश्रम आहे, तोही बघून या’, असे सुचवतात. त्यातील काही जणांना अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांपैकी कशाचीही आवड नसते. अशा व्यक्ती आश्रमात केवळ ‘एक पर्यटनस्थळ बघणे’ या उद्देशाने येतात. त्यामुळे त्यांना आश्रमदर्शनाचा खर्या अर्थाने काहीच लाभ होत नाही. त्याचबरोबर ते आश्रमात आल्यावर त्यांचा पाहुणचार करण्यात साधकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे साधकांनी सनातनचा आश्रम बघण्यासाठी अध्यात्म, साधना, राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठीचे कार्य यांसारख्या विषयांच्या संदर्भात जिज्ञासा किंवा तळमळ असणार्यांनाच पाठवावे.’ |